प्रतिनिधी / सांगली
महापूर, कोरोना संकटामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. व्यापारी आर्थिक अडचणीमध्ये सापडले आहेत. एकीकडे संकटाचा तडाखा अन् दुसरीकडे शासनाकडून मिळत नसलेली मदत यामुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. व्यापाऱ्यांची ही स्थिती लक्षात घेत येत्या गुरुवार, 27 मे पासून सर्व व्यापाऱ्यांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची मुभा द्यावी, अशी मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.
लॉकडाऊनमुळे त्रस्त असलेल्या व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह आमदार गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी डॉ. राऊत यांची भेट घेतली. यावेळी भाजपा गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका सविता मदने, व्यापारी महासंघ अध्यक्ष अतुल शहा, किराणा माल महासंघाचे अध्यक्ष अरुण दांडेकर, डेअरी असोसिएशनचे चेतन दडगे, प्रसाद गवळी, कापड व्यापारी असोसिएशनचे सुभाष रामनिवास सारडा यांच्यासह राजेंद्र पवार, अमर दीडवळ आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामुळे व्यापायांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुरात सांगली शहराची बाजारपेठ पाण्याखाली होती. गेल्या वर्षी मार्च पासूनच कोरोनाचे लॉकडाऊन सुरू होते.
त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पुन्हा सुमारे तीन ते चार महिने बाजारपेठ बंद होण्याची वेळ आली. यंदा मार्चपासून बाजारपेठेत कोरोनाच्या तडाख्यात सापडली. आधी निर्बंध आणि त्यानंतर लॉकडाऊन यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. यामध्ये व्यापाऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. एकीकडे महापूर, सलग दोन वर्ष कोरोनाच्या आपत्तीचा तडाका यामुळे हजारो व्यापारी आर्थिकदृष्ट्या खचले आहेत. यामुळे येत्या गुरुवार 27 मे पासून सर्व व्यापाऱयांना सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. व्यापाऱ्यांना शासनाकडून आर्थिक सहाय्य, कर माफीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
फळ, कांदा-बटाटा मार्केट सुरु करा
आमदार गाडगीळ म्हणाले, लॉकडाऊनमुळे फळ तसेच कांदा-बटाटा मार्केट बंद आहे. होसलेस भाजी बाजारही बंद आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. याशिवाय नागरिकांनाही चढ्या दराने भाजीपाला, फळे खरेदी करावी लागत आहेत. त्यामुळे शेतकरी, नागरिकांचा विचार करुन फळ तसेच कांदा-बटाटा मार्केट सुरु करावे, अशी मागणही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

गेल्या दोन वर्षातील सर्व प्रमुख सण आणि लग्नसराईच्या हंगामात बाजारपेठा बंद ठेवण्याची वेळ आल्यामुळे व्यापाऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. त्याबरोबरच व्यापाऱ्यांचे स्वतःचे कुटुंब, कर्मचारी, त्यांचे कुटुंब हे सर्व आर्थिक अडचणीत सापडले असल्याने त्यांची उपासमार होऊ लागली आहे. कर्जाचे हप्ते शिवाय शासनाचे कर हेही त्यांना भरावे लागत आहे. यातही त्यांना शासनाकडून कोणतीही सूट मिळाली नाही. त्यांना आता या परिस्थितीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत व्यापार सुरू करण्याची मुभा देण्यात यावी शासनाकडून त्यांना आर्थिक सहकार्य तसेच कर माफी देण्याबाबतही गांभीर्याने विचार करावा.








