बाधितांकडून निर्बंधांचे उल्लंघन, घरातील सदस्यांचा बिनधास्त वावर
प्रतिनिधी / कडेगाव
दुसऱ्या लाटेत कडेगाव तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे अशा परिस्थितीत तीव्र लक्षणे नसणाऱ्या कोरोनाच्या रूग्णावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. पण होमक्वारंटाईन असलेल्या बहुतांश बाधितांकडून विलगीकरणासंदर्भात नियमांचे सरौस उल्लंघन होत आहे. शिवाय बाधितांच्या घरातील सदस्यांचा मुक्त वावर या बाबी कोरोना प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.
पहिल्या लाटेत बाधित रुग्णांच्या संर्पकातील व्यक्तींना प्रशासनाकडून संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जात होते. शिवाय ज्यांना लक्षणे नाहीत त्यांनाही कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत होते. तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून उपचार करण्यात येत होते. मात्र, दुसऱ्या लाटेत लक्षणे नसणाऱ्या बाधित रूग्णांना घरीच उपचार करण्यात येत आहेत. शिवाय बाधित व्यक्तीच्या घरातील अन्य सदस्यांनाही सामाजिक अंतराबाबत काही निर्बंध प्रशासनाने घालून दिले आहेत. पण त्याचे सररास उल्लंघन होताना दिसत आहे. बाधित रूग्ण जरी गृहविरगीकरणात असला तरी त्याचा घरात सर्वत्र वावर असतो. त्यामुळे घरातील सदस्यही बाधित होण्याचा धोका आहे. त्यांनाही कोरोना संसर्ग झाल्याची उदाहरणे आहेत. शिवाय हे सदस्य बिनधास्त भाजीपाला,किराणा खरेदीसाठी बाहेर पडत आहेत.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
शेजारील कुटुंबातील व्यक्तींना हे दिसत असते. पण वाईटपणा कोण घेणार म्हणून ते बोलत नाहीत. तर प्रशासनातील अधिकारी म्हणतात यांची नावे सांगा मात्र नावे कोण सांगणार असे सर्व चित्र आहे. नगरपंचायत व ग्रामपंचायत यांच्या वतीने बाधित कुटुंबातील घरावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कमेटी स्थापन करण्याची गरज आहे. बाधित कुटुंब कोरोना निर्बंधांचे पालन करत आहेत का? रूग्णांच्या संपर्कातील व्यक्ती खबरदारी घेते का याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तरच कोरोना साकळी तोडणे शक्य होणार आहे. या सर्व परिस्थितीमुळे होमक्वारंटाईन आता धोकादायक ठरताना दिसत आहे.