प्रतिनिधी/जत
हिवरे (ता. जत) येथे भटकी जनावरे व वन्य प्राणी पासून पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून पिकात सोडलेल्या विजेच्या तारेला धक्का लागून एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. शंकर मारूती बंडगर (वय ४५, रा. हिवरे, ता. जत) असे मृत व्यक्तीचे नाव आहे, बुधवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या पूर्वी ही घटना घडली. याबाबत जत पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ तुकाराम मारूती बंडगर (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी जत पोलिसांनी शंकर बंडगर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने रावसाहेब राजाराम बंडगर व माणिक रावसाहेब बंडगर (दोघे रा. हिवरे) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रावसाहेब व माणिक बंडगर यांनी आपल्या मक्याच्या शेतात कुत्री व वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठी शेजारीच असलेल्या विजेच्या तारेवर आकडा टाकून ती तार मक्याच्या पिकात सोडली होती. मात्र, याची माहिती शेजारील शेतकऱ्याला नव्हती.
दरम्यान, पहाटे रावसाहेब बंडगर यांच्या शेतालगत असलेल्या पाय वाटेवरून जात असताना या मोकळ्या विजेच्या तारेला पाय लागला. यातच बंडगर यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कत्ते करत आहेत.
Previous Articleइंधन मागणी पूर्ववत होण्यास लागणार सहा-नऊ महिने ?
Next Article कोल्हापूर जिल्हय़ात 12 बळी, 702 पॉझिटिव्ह








