संपूर्ण डोंगर परिसर जळून खाक
हातनुर / वार्ताहर
दुपारी बारा वाजता आकस्मिक लागलेल्या आगीमध्ये होनाई डोंगर परिसरातील लाखो वृक्ष, हजारो पक्षांची घरटी, पुरातन खंडोबाचे मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. श्री होनाई देवीच्या मुख्य मंदिराचे काम सुरु आहे तात्पुरत्या उभारलेल्या मंदिरापासून सुरुवात झालेली आग पसरत जाऊन आगीने पुर्ण डोंगराला वेढला गेला. यामध्ये श्री होनाई देवीच्या डोंगरावरील छोटे पठार व मोठे पठारावरील संपूर्ण झाडे व गवत जळून खाक झाले.तसेच हातणोली हद्दीतील बऱ्याच भागात आगीने नुकसान झाले.
वीस ते पंचवीस फूटांपेक्षा उंच आगीच्या ज्वाळा मध्ये मोठे मोठे वृक्ष जळून खाक झाले.हातनूर ग्रामपंचायतीचीच्यावतीने सलग दहा ते पंधरा वर्षे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेत हातनूर गावात व परिसरात व ग्रामदैवत होनाईदेवी डोंगरावर हजारो झाडे लावली होती व पाणी घालून जगवली होती. याशिवाय संत नामदेव नूतन मराठी विद्यामंदिर तासगाव, जिल्हा परिषद शाळा हातनुर, उज्वल विद्यामंदिर हातनुर, रा. शा. माने विद्यालय विसापूर, संत ज्ञानेश्वर हायस्कूल, जिल्हा परिषद शाळा विसापूर, हातनोली, धामणी, पाडळी, परिसरातून व परराज्यातून येणारे भाविक, ग्रामस्थ, नागरिक व ट्रस्टने लावलेली सर्व झाडे या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
आगीची भीषणता इतकी होती की तिला थोपवण्याचे किंवा विझवण्याचे कोणतेही प्रयत्न निष्फळ ठरत होते. सुमारे 65 ते 70 टक्के डोंगर जळून खाक झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वन्य व प्राणी जीवनाचे वैविध्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. शेकडो वर्षाच्या होनाई देवीचे इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आग लागली असल्याचे ज्येष्ठांनी सांगितले. परंतु होनाई देवीचे मूळ स्थान पायऱ्या,कुस्ती मैदान व दर्शनी भागाकडील कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. या बाजूकडे आग न येऊ देणेसाठी सुट्टीवर असलेले पोलीस कर्मचारी एकनाथ भाट, शिक्षक शशिकांत पाटील, होनाई परिसरातील बांधकामावर असलेले अमोल सुतार व परप्रांतीय कर्मचारी तसेच जनावरे चारण्यासाठी आलेले गुराखी यांनी प्रयत्न केले. त्यामुळे दर्शनी भाग वाचवता आला.
वेळोवेळी लावलेली चिंच, कडूनिंब तसेच शासकीय लावलेली झाडे व वन विभागानेही मोट्या प्रमाणात झाडांची लागवड केली होती. ही सर्व झाडे या आगीमध्ये जळून खाक झाली. संपूर्ण डोंगर परिसरावर पक्ष्यांचे थवे आपल्या घरट्यांसाठी आकांत करीत असल्याचे विदारक चित्र दिसून येत होते.
डोंगराला लागलेल्या आगीची बातमी समजताच माजी जि प सदस्य मोहन आणा पाटील यांनी तासगाव नगरपालिका येथे फोन करून माहिती दिली तासगाव नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली . मात्र तोपर्यंत डोंगराचा बराचसा भाग जळून खाक झाला होता. ज्या ठिकाणी आग सुरू होती त्या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी जाणे शक्य नव्हते. यामुळे त्यांना आग पाहत राहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. 1972, 2003, 2013, च्या भीषण दुष्काळामध्ये ग्रामपंचायतीची च्या वतीने टँकर ने पाणी घालून पोटच्या पोराप्रमाणे जगवलेली सर्व झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
येणाऱ्या पावसाळ्यापासून श्रावणापर्यंत नव्याने वृक्षारोपण करून सर्व शाळा, सेवाभावी संस्था, शासन व होनाईचे सर्व भाविक यांच्या मदतीने पुन्हा एकदा होनाईच्या डोंगर परिसराला हिरवा शालू नेसवण्याचा मनोदय गावातील जेस्ट युवक विविध क्रिडा मंडळे ग्रामपंचायत विविध संस्था चे पदाधिकारी मोहन आण्णा पाटील विलासभाऊ पाटील प्रकाश बापू खूजट मुख्याध्यापक आनंदराव पाटील बाळासो शेट किसन पाटील तसेच जिल्हा परिषद शाळा हातनूरचे शिक्षक शशिकांत पाटील,एकनाथ भाट व घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्यक्त केला.दिवसभर हातनूर तसेच पंचक्रोशीतील विविध संस्था चे पद्धधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व हळहळ व्यक्त केली.