मिरज ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथील दत्त मंदिराजवळ राहणाऱ्या वैशाली हनुमंत पाटील वय 35 या महिलेचे घर फोडून चोरट्यांनी सुमारे 80 हजार रुपयांचे दागिने लंपास केले. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत वैशाली पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान मिरज ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, सुभाषनगरमध्ये भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
वैशाली पाटील या बुधवारी दुपारी एक नंतर घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. त्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी घरी परत आल्या असता त्यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता लोखंडी ट्रंक मधील 27 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 80 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. चोरट्यांनी वैशाली पाटील यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ही चोरी केल्याचे स्पष्ट झाले. याबाबत वैशाली पाटील यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या दोन आठवड्यांपासून चोऱ्यांचे सत्र सुरू असून दररोज मोटरसायकली मोबाईल चोरी आणि घरफोडीच्या घटना घडत आहेत. मालगाव येथे दोन दिवसापूर्वी एका निवृत्त पोलिसाचे घर फोडून चोरी झाली होती. लगेच दुसऱ्या दिवशी सुभाषनगर येथे भरदिवसा घरफोडी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. ग्रामीण भागात दौरा करणारा टोळ्यांचा सुळसुळाट झाला असल्याची शक्यता असल्याने पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.