वार्ताहर / देवराष्टे
सध्या ऊन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. या कालावधीत बागायती पिकांना पाण्याची प्रचंड आवश्यकता आहे. ताकारी, टेंभू, आरफळ सह जिल्हातील अन्य सिंचन योजनाही सुरू आहेत. परंतु महावितरणकडुन शेतीसाठी करण्यात येणारा वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पाणी असुनही पिके करपु लागली आहेत. वारंवार होणारी सिंगल फेज, बंद पडलेले ट्रान्सफार्मर, अपुरा वीजपुरवठा यामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे.
शेतीसाठी पाण्याचा वापर ऊन्हाळयात मोठ्या प्रमाणात होतो. विहीर व बोअरवेलमधुन विद्युतपंप्पाच्या माध्यमातून शेतकरी पाणी उपसा करत असतात. यासाठी महावितरणकडुन शेतीला दिवसा आठ तास व रात्री दहा तास असा वीजपुरवठा करण्यात येतो. या कालावधीतही ट्रान्सफार्मवरील ओव्हरलोडमुळे दर तासा दोन तासांनी सिगल फेज होऊन विद्युत पुरवठा बंद पडतो. यावेळी लाइनमन येउन विद्युतपुरवठा पुर्ववत करेपर्यंत वेळ निघुन जातो. त्यामुळे शेतीसाठी दिवसा जेमतेम पाच ते सहा तासच वीजपुरवठा होत आहे. तर यामध्ये भर म्हणून मंगळवारी दिवसभर दुरूस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.
सध्या सगळीकडेच ही परिस्थिती असुन महावितरणची मनमानी सुरू आहे. देवराष्टेतील एक ट्रान्सफार्मर मागील वर्षी ऐन ऊन्हाळयात बंद पडला. त्यावेळी कोरोनाचे कारण देत महावितरणने ट्रान्सफार्मर बदलून देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शेतकर्यानी स्वखर्चाने हा ट्रान्सफार्मर दुरूस्त केला. आता यावर्षी पुन्हा हा ट्रान्सफार्मर गत चार दिवसापासून बंद पडला आहे. पिके वाळत असताना महावितरणचे अधिकारी मात्र कागद घोडे नाचवत आहेत. कृषीराज्यमंत्री विश्वजित कदम यांनी लक्ष देऊन महावितरणचा कारभार सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यातुन होत आहे.