सावळज, सिध्देवाडीतील पुल तुटले, अनेक बंधारे फुटून शेतीचे नुकसान
सावळज / वार्ताहर:
सावळज परीसरात बुधवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसामुळे अग्रणी नदीला महापुराचे थैमान सुरू आहे. या महापुराने येथील नदीवरील सावळज-बिरणवाडी व सिध्देवाडी- चव्हाणवस्ती पुल तुटून रस्ता खचु लागला आहे. तसेच दोन बंधार्याचे बांध फुटन बाजुने शेतात पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले आहे.
कालपासून सावळज परीसरात सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. सावळज परीसरात बुधवारी ६७ मिमी. पाऊस झाला आहे पण खानापुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अग्रणी नदीला महापुर आला असुन सावळज परीसरातील अनेक पुलांचे, बंधार्याचे तसेच शेतीचे नुकसान झाले आहे. येथील सावळज-बिरणवाडी पुल चार दिवसात दुसर्यांदा पाण्याखाली गेला. पण रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे या पुलाचा कटडा तुटून एका बाजुने पुल व रस्ता खचुन वाहुन चालला आहे. तर सिध्देवाडी-चव्हाणवस्ती येथील नदीवरील पूल ही तुटून अर्धा रस्ता वाहुन गेला आहे.
तसेच सावळज पुलाजवळील बंधारा व बसवेश्वरनगर येथील मौल्याचा बंधारा या दोन्ही बंधार्याचे बांध फुटले आहेत बांध सुटल्याने शेतात पुराचे पाणी शिरून शेतीचे नुकसान झाले आहे. शेतातील मातीसह पिके व द्राक्षबागेची वेली वाहून नुकसान झाले आहे. मात्र खानापुर तालुक्यात पडणार्या पावसाची धास्ती तासगांव तालुक्यातील अग्रणी नदीकाठावरील नागरिकांनी घेतली आहे. सावळज-बिरणवाडी पुल, सावळज-श्री जोतीबा रोड ( जुना तासगाव रस्ता ) वरील पुल, सिध्देवाडी ते चव्हाणवस्ती, वायफळे-यमगरवाडी, वायफळे-सैनिकमळा पुल, गव्हाण-वज्रचौंडे पुल, गव्हाण – मणेराजुरी अग्रणी पात्रातील पूल अद्याप पाण्याखाली असुन यासह परिसरातील ओढे-नाले वरील अनेक पुलावर पाणी आले असुन अग्रणी नदी दुथडी भरून वाहत आहे.








