वार्ताहर/शेडगेवाडी
शिराळा तालुक्यातील सावंतवाडी येथे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीने घराच्या पाठीमागे असलेल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. राजाराम शंकर सावंत असे या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने गावातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची फिर्याद वसंत आकाराम सावंत यांनी कोकरूड पोलिसात दिली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील राजाराम सावंत हे शाहूवाडी तालुक्यातील सोंडोली मधील एका हॉटेलमध्ये कामाला होते. मागील चार-पाच दिवसापूर्वी ते आपल्या गावी सावंतवाडी येथे आले होते. यावेळी परजिल्ह्यातून आल्याच्या कारणावरून कुटुंबातील लोकांनी त्यास भावकीतील एका घरात क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ते त्याठिकाणी रहात होते. मात्र तो इतरत्र भटकत असायचा. तो दारूच्या नशेत दररोज असायचा. आज मंगळवार दि.4 रोजी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास त्याने, घरा पाठीमागील झाडास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दारूच्या नशेतच सावंत यांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. घटनेची नोंद कोकरुड पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.