प्रतिनिधी /सांगली
महापौरपदाच्या निवडणुकीत विरोधकांनी ”घोडेबाजार”करून भाजपची महापालिकेतील सत्ता हस्तगत करण्यात जरी यश मिळवले असले तरी कारभारात सत्ताधाऱ्यांना एकाही रुपयाचा भ्रष्ट्राचार करू देणार नाही. भाजपाचे नगरसेवक फोडण्यासाठी खर्च झालेला पैसा महापालिकेत जनतेचे पैसे लुटुन वसुली करण्याचा डाव आम्ही उधळुन लावणार असल्याचा इशारा नगरसेविका व भाजपा महिला जिल्हाध्यक्षा ॲड.स्वाती शिंदे यांनी दिला आहे.
नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या ७ नगरसेवकांनी विरोधकांना मतदान केल्याने भाजपची महापालिकेतील सत्ता गेली. २०१८ साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने भाजपच्या बाजूने स्पष्ट कौल देत भाजपच्या हाती सत्ता सोपवली होती. भाजपचे ४१ नगरसेवक निवडून दिले. भाजपची महापालिकेत सत्ता आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला विविध विकासकामांसाठी १०० कोटी रुपयांचा मोठा निधी दिला. महापालिका स्थापनेपासून इतका मोठा निधी विकासकामांना कधीही मिळाला नव्हता. सत्तेत आलेल्या भाजपने कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता सर्व पक्षाच्या नगरसेवकांना समान निधी दिला होता. मिळालेल्या निधीच्या माध्यमातून भाजपने महापालिका क्षेत्रातील विकासकामांना गती दिली होती.
आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनीही ३५ कोटी रुपये सांगलीतील रस्त्यासाठी आणले होते. बकाल खेड्याचे स्वरूप आलेल्या महापालिका क्षेत्राचे स्वरूप बदलण्याचे काम भाजपाने केले. मिळालेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत भाजपने महासभेत एकही ऐनवेळचा विषय आणला नाही. पूर्वीचा महासभा गुंडाळण्याचा पायंडा भाजपाने मोडीत काढला. महापूर, कोरोना महामारीसारख्या संकटांत उत्तम नियोजन केले. ओबीसी महिला महापौरपदाचा कालावधी संपल्यानंतर महापौरपद खुले होते. आपल्या हातून महापालिका, जिल्हापरिषद, बाजारसमिती सारखी सत्तेची प्रमुख ठिकाणे निसटल्याची खंत कॉग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी भाजपचे नगरसेवक पैशाचे अमिष दाखवून फोडले आणि सत्ता मिळवली.
घोडेबाजार करून सत्ता मिळवली असली तरी कारभारात कोणालाही घोडेबाजार अजिबात करू देणार नाही असा इशारा ॲड. शिंदे यांनी दिला आहे. महापालिकेतील व रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी नागरिकांची आम्हाला साथ आहे. चांगल्या कामासाठी आम्ही जरूर साथ देऊ पण बेकायदेशीर कामे आम्ही होवु देणार नाही. राष्ट्रवादी ज्याला करेक्ट कार्यक्रम”म्हणते तो घोडेबाजार जनतेलाच मान्य नसून आगामी काळात जनताच उत्तर देईल असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
Previous Articleरत्नागिरी : दापोलीत मास्क न वापरणाऱ्या १४ जणांवर कारवाई
Next Article कोल्हापूर : राजकारणासाठी अज्ञान प्रकट करू नका








