राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम : ताकारीच्या वितरीका क्रमांक 2 चे पाणी परिचलन व पाणी पूजन
वार्ताहर / देवराष्ट्रे
शाश्वत शेती करण्यासाठी पाण्याचीही शाश्वती असणे आवश्यक आहे. शेतकऱयाला पाण्याचा कायमस्वरूपी स्त्रोत निर्माण झाल्यानंतर शेती उत्पादनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल. शाश्वत पाण्यासाठी जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना प्राधान्याने पूर्ण करू. शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहिन, अशी ग्वाही कृषि राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे येथे ताकारी योजनेतून कडेगाव व पलूस तालुक्यातील 2400 हेक्टर लाभक्षेत्राला पाणी देणाऱया वितरीका क्रमांक 2 चे पाणी परिचलन व पाणी पूजन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. यावेळी विश्वजित कदम म्हणाले, ताकारी योजनेसाठी माजी मंत्री स्व. आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. यामुळे लाभक्षेत्रात येणारा दुष्काळी भाग आता सुजलाम सुफलाम झाला आहे. वितरीका 2 च्या माध्यमातून वंचित भागाला पाणी देण्याचे त्यांनी स्वप्न पाहिले होते व ते पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला, आज त्यांच्या स्मृतीदिनी या वितरीकेचे परिचलन सुरू झाले आणि पाणीपूजन झाल्याने त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. आता सिंचन योजनांची उर्वरीत कामेही गतीने पूर्ण करण्यात येतील.
यावेळी ताकारी पंपगृह क्र. 1 चे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी वितरीकेची माहिती दिली, यावेळी प्रांताधिकारी आयुषी सिंह व गणेश मरकड, तहसिलदार शैलजा पाटील, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन नाईक, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम, बाळासाहेब पवार उपस्थित होते .
नियमित कर्जदारांच्या प्रोत्साहन अनुदानासाठी पुरवणी मागणी
राज्यातील कृषि उत्पन्नामध्ये 11.50 टक्क्यांची वाढ झाली आहे. ही एक आशेची बाब आहे. नियमित कर्ज फेडणाऱया शेतकऱयांसाठी 50 हजार रूपये प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत शासन स्तरावरील पुरवणी मागण्यांमध्ये याबाबतचा पाठपुरावा करण्यात येईल, असे ते विश्वजित कदम यांनी सांगितले.








