पहिल्याच आठवडा बाजारात रेशनच्या धान्यांची जोमाने विक्री
शरद माने / वाळवा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेला लॉकडाऊन व निर्बंध यामुळे गेल्या ५-६ माहिन्यांपासून ग्रामीण भागातील आठवडा बाजार बंद होता. वाळव्यात शुक्रवारी तो पूर्ववत भरण्यास सुरुवात झाल्याने ग्राहक वर्ग सुखावला असल्याचे चित्र आहे. भाजीपाला व अन्य जीवनावश्यक साहित्य विक्रेते मोठ्या उत्साहात दुकाने मांडून खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर आपला व्यवसाय पूर्व पदावर आणण्याच्या प्रयत्नात दिसून आले. बाजारात गर्दी नसली तरी बाजार बऱ्यापैकी भरल्याचे चित्र होते.
नुकताच महापूर येऊन कृष्णाकाठावरील जनजीवन कोलमडून गेले त्या संकटातून जनता सावरू लागली आहे. शासनाने पूरग्रस्त लोकांना दिलासा देत शासकीय मदत देखील घोषित केली आहे. पूरग्रस्तांचे पंचनामे करीत त्यांना शासकीय मदत देण्याच्या उद्देशाने शासनाकडून मोफत धान्य वाटप देखील सुरु झाले. १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ किलो तूरडाळ असे धान्याचे वाटप देखील पूर्णत्वाकडे आले आहे. शिधापत्रिका धारक पूरग्रस्त कुटूंबाना हे मोफत वाटप करण्यात आले.
सरकारकडून ही धान्याची मदत मिळाल्यामुळे लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दरम्यान आठवडा बाजार भरल्यामुळे बाजारात गहू व तांदुळ खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा धंदा तेजीत आला असून गहू प्रति किलो १२ रुपये तर तांदूळ १३ रुपये प्रमाणे खरेदी करत, व्यापाऱ्यांनी पोतीच्या पोती भरून व्यवसाय केल्याचे चित्र सध्या बाजारात दिसत आहे. पूरग्रस्त परिस्थितीतून सावरणारी जनता मोफत मिळालेल्या धान्याला बाजार दाखवून त्यातून पैसे मिळवणार असेल तर मग शासनाने मदत म्हणून मोफत धान्य देण्याला अर्थच ऊरत नाही त्यामुळे शासनाने गरजवंतांनाच धान्य वाटप करणे हिताचे ठरेल असे चित्र दिसत आहे. परंतु खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर आठवडा बाजार सुरु झाल्यानंतर पहिल्याच बाजारात धान्य विक्री जोमाने होणं ही बाब निश्चीतच विचार करायला लावणारी आहे.








