प्रतिनिधी / शिराळा
शिराळ तालुक्यातील बिळाशी हे गाव भारताच्या स्वातंत्र्य चळवळीपासून प्रकाशझोतात आहे. इथे झालेला ‘जंगल सत्याग्रह’ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाची घटना. या गावाला स्वातंत्र्यसैनिकांचा मोठा वारसा आहे. याच गावातील शाहीर सुरेश पाटील हे अनेक वर्षांपासून पोवाड्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि जनजागृती करत आहेत. शेती करत असताना त्यांनी शाहिरी लोककला जपली आहे. कोरोनाच्या काळात ही त्यांनी आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून ही प्रबोधनाची परंपरा चालू ठेवली आहे.
शाहिरी काव्याची परंपरा फार प्राचीन असून ती आजतागायत अखंडितपणे चालू आहे. शिवकाळात या लोककलेला खरा बहर आला. आज उपलब्ध असलेल्या पोवाड्यांतील सर्वांत जुने पोवाडे शिवकालातील आहेत. शाहिरी वाङ्मय मौखिक परंपरेने आजही आपापल्या ‘वळीतून’ किंवा ‘फडातून’ बदलत्या जीवनसंदर्भानुसार बदलत प्रवाही राहिलेले आहे. झाशीची राणी , महात्मा जोतीराव फुले, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, तसेच १८५७ चे बंड, ‘छोडो भारत चळवळ’ हे पोवाड्यांचे विषय झाले आहेत. समाजाच्या निरनिराळ्या स्तरांतून शाहीर पुढे आले आहेत. स्वातंत्र्यलढा, युवकांचे कार्य, सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतानिवारण, हुंडाबंदी, सामाजिक परिवर्तन अशा विषयांवर मराठी शाहिरी अभिनिवेशाने बोलू लागली.
शाहीर सुरेश पाटील हे सुद्धा आपल्या पोवाड्यातून हाच प्रबोधनाचा वारसा पुढे चालवत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत स्त्री-भ्रूणहत्या, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता ,पर्यावरण शिक्षण अशा अनेक विषयावर सादरीकरण केले आहे. किल्ल्यांचे संवर्धन ते अलीकडील मोबाईलचा अतिरेक वापर यावरही ते पोवाड्याच्या माध्यमातून भाष्य करतात. कोरोना परिस्थिती आणि त्यानंतरची परिस्थिती यावरही त्यांनी पोवाडा रचला आहे. कोरोना नंतर पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याचा संदेश ते आपल्या पोवाड्याच्या माध्यमातून देत आहेत. शाहिरी कला ही त्यांनी केवळ छंद आणि आवड म्हणून झोपायली आहे. खरंतर ते शेतकरी आहेत. शेती करत वेळ काढून ते शाहिरी पोवाडे रचतात आणि त्याचे सादरीकरण ही करतात.
समाज प्रबोधन आणि लोककला संवर्धनासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे . यामध्ये केंद्र शासनाच्या नेहरू युवा केंद्राबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभाग, ग्रामविकास विभाग ,स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभागाने त्यांना सन्मानित केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुणे ते पंढरपूर प्रबोधन दिंडीत त्यांनी सहभाग घेतला होता. शिवाय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा जागर समतेच्या या उपक्रमातील योगदानाबद्दल, तसेच दारूबंदी प्रचार कार्य व शिक्षणासाठी समाज कल्याण विभाग पुणे यांनी देखील त्यांचा गौरव केला आहे.








