सांगली/ प्रतिनिधी
सांगली शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या व्यापारी पेठेतील अतिक्रमण हटविण्याची मोहीम तीव्र झाली आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने ही कारवाई सुरु झाली आहे. महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्या सह टीमकडून कारवाई सुरू आहे.
सांगली शहरातील प्रमुख मार्गावरील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर वाढीव शेड, पत्रे मारून अडथळा निर्माण केला होता. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने गर्दी होत होती. यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीती होती. याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी अतिक्रमण काढणेचे आदेश दिले होते. या आदेशानुसार सांगली शहरातील बालाजी चौक ते मारुती रोडवरील अतिक्रमने बुधवारी सकाळी अतिक्रमने उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. या मोहिमेत सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे , स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, गणेश माळी, वैभव कुदळे, किशोर कांबळे, अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे यांच्या पथकाने सहभाग घेतला होता.
या कारवाईमध्ये बालाजी चौकातील व्यापाऱ्यांची वाढीव शेड मनपाने हटविली आहेत. याचबरोबर रस्त्यावरील बोर्ड, दुकानासमोरील लोखंडी रॅक सुद्धा कारवाईत जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत मोठ्या प्रमाणात साहित्यही मनपाने ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे सांगलीच्या गर्दीत सापडलेल्या बालाजी चौक आणि मारुती रोडने मोकळा स्वास घेतला आहे. याचे नागरिकांनी स्वागत केले आहे. सांगली शहर अतिक्रमण मुक्त करण्यासाठीची ही मोहीम
आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सुरू राहणार असून व्यापारी आणि फेरीवाले तसेच किरकोळ विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करू नये आणि जर केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे.