सांगली / प्रतिनिधी
गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण देशात धुमाकुळ घालत असलेला ओमिक्रॉन व्हेरियंट सांगलीत आढळून आला असून विश्रामबाग शंभरफुटी परिसरातील पती-पत्नीचा ओमिक्रॉनचा अहवाल पॉझिटीव्ह आढळून आला आहे. या पती-पत्नीची तब्येत अगदी ठणठणीत आहे त्यामुळे घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.
विश्रामबाग येथील शंभरफुटी परिसरातील ५२ आणि ५० वय असणारे पती पत्नी २५ डिसेंबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना खोकला आणि अधिकचा ताप असल्याने त्यांची जिनोओग सिक्वेसिंग चाचणी एका खासगी प्रयोगशाळेच्या माध्यमातून करण्यात आली होती. या चाचणीमध्ये त्यांना ओमिक्रॉन झाला असल्याचा अहवाल रविवारी दोन जानेवारी रोजी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सांगली शहरात ओमिक्रॉनचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. हे पती पत्नी होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच हे रूग्ण ज्या परिसरात राहतात. त्या परिसरात कटोन्मेंट झोन महापालिकेकडून करण्यात आला आहे.









