प्रतिनिधी / पलुस
आमणापूर येथील कुंडल वाट परिसरातील नागरिकांना रस्त्याकडेच्या निचरा चरीत एक मोठे सायाळ पहायला मिळाले. अंगावर मोठे अनकुचीदार काटे असणारे हे सायाळ चरीतील चिखलात धडपड करताना दिसले. हे सायाळ जखमी असल्याचे लक्षात येताच प्राथमिक शिक्षक संदीप भोई यांनी प्राणीमित्र मोहसीन सुतार यांना पाचारण केले. सुतार यांनी वन विभागास वर्दी देऊन घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनी या सायाळाला चिखलातून बाहेर काढून पाण्याने स्वच्छ केले. यावेळी ते अंध असल्याचे आणि आजारी असल्याने शारीरिक समतोल ढासळल्याचे लक्षात आले.
त्याच्यावर उपचार सुरु असताना रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर वन विभागाचे परिमंडळ अधिकारी मारूती ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र अधिकारी शहाजी ठोरे यांनी त्याला ताब्यात घेतले. पलुसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.ऋतुराज कदम यांनी शवविच्छेदन करून वन विभागाकडून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डोळे, फुफ्फुस, ह्रदय आणि शरीरातील काही भागांत संसर्ग झाल्यामुळे या सायाळ मादीचा मृत्यू झाल्याचे डॉ कदम यांनी सांगितले.