प्रतिनिधी / सांगली
सध्या सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. सामान्यापासून असामान्यापर्यंत सर्वच त्रस्त झालेले आहेत. लॉकडाऊन मुळे सर्वजन घरी असून, याचा फटका सर्वांनाच बसू लागलेला आहे. मग पैलवानच कसा अपवाद राहील. तुंग येथील राष्ट्रीय खेलो इंडिया पदक विजेती मल्ल कु. संजना खंडु बागडीवर सध्या रोजंदारीवर जाण्याची वेळ आली आहे.
गेली दोन वर्ष कोरोनामुळे कुस्त्यांची मैदाने झालेली नाहीत, महाराष्ट्र केसरी, इतर कुस्ती स्पर्धा झालेल्या नाहीत, विविध शासनाच्या स्पर्धा नाही, त्यामुळे मिळणारे मानधन नाही.
जे काही विविध क्षेत्रातील दानशूर मंडळी आहेत. त्यांच्या देणगीवर पैलवानकी करणेही मुश्किल झाले आहे. व्यायामशाळा ओस पडू लागल्या असून तालमीमध्ये घुमणारा आवाजही थांबला आहे. अशावेळी पैलवानाना पण मिळेल ते काम जगावे लागत आहे.
त्यापैकीच असलेली तुंग येथील 12 वीची विद्यार्थिनी कु. संजना बागडी ही भटक्या विमुक्त समाजातील असून कुटुंबासह मच्छीमारीचा व्यवसाय करून पैलवानकीचे धडे गिरवत आहे. संजना ही आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्र कवलापूर येथे कुस्ती कोच उत्तमराव पाटील, दीपक पाटील, सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
ती रोज तुंग ते कवलापुर दररोज २५ कि मी प्रवास करून न चुकता सराव करते. तीने राज्यस्तरीय संघटनेच्या, शासकीय, शालेय स्पर्धा, सुवर्ण पदक, आणि ओपन मध्ये होणाऱ्या कुस्त्यामध्ये, भारतीय कुस्ती महासंघाच्या स्पर्धेत कास्य पदके, खेलो इंडिया कास्य पदके घेतली आहेत. तिला मच्छीमारीचा व्यवसाय करून चार पैसे मिळत होते. पण सध्या बाजार बंद असल्याने तिला पैशासाठी लोकांच्या बांधावर रोजंदारीवर ३०० रुपये हजेरीवर जाण्याची वेळ आली आहे.