सभा गुरुवारपर्यंत तहकूब, प्रशासनाची मनमानी, सदस्य आक्रमक
प्रतिनिधी / सांगली :
महापालिकेच्या निधीतून खरेदी करण्यात आलेले व्हेंटिलेटर महापौर, उपमहापौर, सभापती, नगरसेवकासह कोणालाही माहिती न देता परस्पर काही बड्या हॉस्पीटल्सना देण्यात आले आहेत. यावरून आज स्थायी समितीच्या सभेमध्ये प्रचंड हंगामा झाला. हे व्हेंटिलेटर्स कोणाला दिले, कोणाच्या शिफारसिवरून देण्यात आले अशा प्रश्नांची सरबत्ती करत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे हे सभागृहात नसल्याने प्रशासनाला माहिती देता आली नाही. त्यामुळे सभा दीड तासासाठी तहकूब करण्यात आली. या काळातही डॉ. आंबोळे सभागृहात आले नाहीत. त्यामुळे अखेर गुरुवार पर्यन्त सभा तहकूब करण्यात आली. महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी सदस्य गजानन मगदूम, मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके, शेडजी मोहिते, राजेंद्र कुंभार, सविता मदने, अनारकली कुरणे, मोहना ठाणेदार यांच्यासह अन्य सदस्य, अधिकारी उपस्थित होते. स्थायी समितीने तातडीची बैठक घेत महापालिकेच्या निधीतून ५५ लाख रुपयांचे १० व्हेंटिलेटर्स खरेदीस मान्यता दिली होती. जिल्हा प्रशासनाच्या एजन्सीकडून व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यात येणार होती. गत आठवड्यात ती खरेदी करण्यात आली. मात्र मनपा पदाधिकारी, नागरसेवक यांना माहिती न देताच ती परस्पर काही हॉस्पिटलालना देण्यात आली. याचे पडसाद आजच्या स्थायी समिती सभेत उमटले.
सदस्य गजानन मागफूम, सविता मदने, मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके यांनी प्रशासनाला याचा जाब विचारला. व्हेंटिलेटर्स खरेदी केली आहेत का? असतील तर कोणाला दिली? कोणाच्या शिफारशीनुसार दिली? अशा प्रशांची सरबत्ती प्रशासनावर केली. आरोग्याधिकारी डॉ. आंबोळे सभागृहात नव्हते. त्यामुळे सदस्य अधिकच आक्रमक झाले.
आंबोळेनी माहिती दिल्याशिवाय सभा चालू देणार नाही, असा इशारा सदस्यांनी दिला. सभापती पांडुरंग कोरे यांनी सभा दीड तासांसाठी तहकूब केली. या काळातही डॉ. आंबोळे सभागृहात फिरकले नाहीत. त्यामुळे सदस्यांनी आणखी गोंधळ घातला. जो पर्यन्त व्हेंटिलेटर्स बाबत माहिती मिळत नाही, तो पर्यन्त सभा तहकूब करण्याची मागणी केली. सदस्यांच्या भावना लक्षात घेत सभापती कोरे यांनी अखेर गुरुवार सकाळी ११ वाजेपर्यत सभा तहकूब करण्याचा निर्णय घेतला. सभा तहकूब झाल्याने ऑक्सिजन प्लांट, बालोद्यान बाबतचा निर्णयही प्रलंबित राहिला.