प्रतिनिधी / सांगली
शिवसदन सहकारी सोसायटीचे संस्थापक वि. रा. जोगळेकर यांचे आज पहाटे तासगाव मुक्कामी वृद्धापकाळाने निधन झाले. कोयना धरणाच्या निर्मितीपूर्व काळापासून ते तरुण अभियंता म्हणून सहभागी होते. महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना अभियांत्रिकी मधील प्रशिक्षणासाठी विदेशी देखील पाठवण्यात आले होते. केवळ शासकीय नोकरी करून आपल्या मनातील विकास समाजात उतरेल असे नाही ह्या आणि ऊर्जा सघनता आणि ग्रामीण विकासाला पूरक तांत्रिक प्रयोग व्हावेत यासाठीच्या ध्येयवादी विचाराने कारकिर्दीच्या ऐन मध्यात त्यांनी उत्तम संधी असलेली सरकारी नोकरी सोडून शिवसदन सहकारी सोसायटीची स्थापना केली.
संस्थेच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून ग्रामीण भागात स्वस्त परंतु टिकाऊ घरे, बायोगॅस संयंत्रे, तयार स्वच्छतागृहे यांची निर्मिती प्रसार, त्यांची डिझाईन मधील प्रयोग केले. कमीत कमी खर्चामध्ये जैविक माध्यमाचा वापर करून जल शुद्धीकरण करण्याचे, जट्रोफा पासून पर्यायी इंधन निर्मितीचे देखील प्रयोग त्यांनी संस्थेच्या माध्यमातून केले होते.
कै. वसंतदादा पाटील यांच्यासह जुन्या पिढीतील अनेक नेते, कार्यकर्ते, देशभरातील अनेक शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध आणि संपर्क होते. त्यांचे मातुल आणि जुन्या पिढीतील स्वातंत्र्यसैनिक विचारवंत यंग मेन्स एज्युकेशन सोसायटीचे ( आताचे आरवाडे हायस्कूल ) संस्थापक कै. दत्त आपटे यांच्या विचारांचा मोठा वारसा त्यांना मिळाला होता. निवृत्ती नंतर शाश्वत ऊर्जेच्या शोधात यातून स्वतःची शोधयात्रा त्यांनी लिहिली तसेच स्वतः अभ्यास करत रामायण महाभारत या ग्रंथांचा सुलभ मराठी अनुवाद त्यांनी केला सध्या देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे सुलभ चरित्र लेखन ते करत होते. जुन्या पिढीतील ध्येयवादी तंत्र-कर्ता हरपला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Previous Articleसोलापूर : उजनी धरणात आवक वाढली, ३२ टक्के पाणीसाठा
Next Article नुकसान भरपाई देण्याची शेतक-यांची मागणी








