उपकेंद्र खानापूर लाच होणार – आ. अनिल बाबर
प्रतिनिधी / विटा
खानापूर घाटमाथ्यावरील लोकांना माझ्यावर विश्वास आहे आणि तो त्यांनी मतपेटीतून दाखवून दिला आहे. शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरलाच होईल, याची मी खात्री देतो. मात्र काही लोकांना प्रसिद्धीत येण्यासाठी खटाटोप करायचे आहेत. या विषयात राजकारण आणू नका. उद्या बस्तवडेला येणार्या समितीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आंदोलन न करण्याचा सल्ला आमदार अनिल बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
तासगावं तालुक्यातील बस्तवडे येथे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रला तत्त्वतः मान्यता दिल्याचे जाहीर झाल्यानंतर खानापूर तालुक्यात खळबळ माजली आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी पत्रकार परिषदेत आमदार अनिल बाबर यांच्यावर टिका केली होती. त्याला प्रत्त्यूतर देताना आमदार अनिल बाबर यांनी या विषयात राजकारण करण्यापेक्षा सबुरीने गेल्यास एकोप्याने निर्णय होईल. आपल्याच पक्षाच्या सहकारी आमदार असताना तुम्ही विरोधात भूमिका घेऊन आंदोलनाची भाषा करणे बरोबर नाही. स्व. आर. आर. पाटील हे महाराष्ट्राचे नेते होते. त्यांना दुष्काळी भागाची जाणिव होती.
त्यामुळे त्यांच्या समर्थकांनीही खानापूरसाठी पाठबळ दिले असते. मात्र तुम्ही अट्टाहास करून खानापूरसाठी उसनं प्रेम दाखवत आहात. करंजेला ग्रमीण रूग्णालय झाले त्यावेळी आम्ही खानापूरसाठी आग्रही होतो. त्यावेळी माजी आमदार सदाशिव पाटील यांनी खानापूरवर प्रेम का दाखवले नाही? असा सवाल आमदार अनिल बाबर यांनी केला.
आमदार बाबर शब्द पाळतील यावर विश्वास – शिंदे
माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे म्हणाले, विद्यापीठ उपकेंद्रांबाबत खानापूर नगरपंचायत समितीने ठराव केला आहे. याबाबत सर्व पक्षिय नेत्यांना निवेदन देण्याचे ठरले होते. आमदार अनिल बाबर यांनी उपकेंद्र खानापूरलाच होईल, असे सांगितले आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे, असे शिंदे म्हणाले.








