प्रतिनिधी / विटा
कोरोनाच्या भीषण संकटात नाती दुरावत चालली आहेत. कोरोना झाल्याचे समजताच रक्ताने जोडलेली माणसं लांब राहतात. कोरोना बाधित मयतावर अंत्यसंस्कार करताना खबरदारी आणि जबाबदारी दोन्हीचे पालन करावे लागते. जिथे नातेवाईक दूर राहतात तिथे नगरपालिकेचे कोव्हीड योद्धे धोका पत्करून ही जबाबदारी पार पाडत आहेत.
कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर संबंधित रुग्णांचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात न देता शासनाच्यावतीने अंत्यसंस्कार करावेत, असे निर्देश आहेत. त्यानुसार तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंतिम संस्कार करण्याचे काम विटा नगरपालिकेवर आले आहे. विटा पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी यासाठी पालिकेच्या आठ ते दहा कर्मचाऱ्यांची टीम नियुक्त केली आहे.
एक ऑगस्ट रोजी वेजेगाव येथील एका कोरोनाग्रस्त मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बुधवारी धोंडगेवाडी येथील 55 वर्षीय मयत व्यक्तीवर विट्यातील येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
तहसिलदार ऋषिकेत शेळके, मुख्याधिकारी अतुल पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, डॉ. अविनाश लोखंडे, डॉ. अभिजित निकम, आरोग्य निरीक्षक आनंदा सावंत, मुकादम राजू पाटील, सुपरवायझर सुरेश साळूंखे, नदीम मुल्ला, सलीम शेख यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी, तहसिल कार्यालय कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी नैतिक कर्तव्याला प्राधान्य देत सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत.
नगरपालिका करीत असलेल्या समाजपयोगी सेवेला नक्कीच सलाम करावा लागेल. विटा नगरपरिषदेच्या कोरोना योध्यांचे जिगरबाज कार्य कौतुकास्पद आहे. या कोरोना योद्धांचे काम बघून विट्यात कोरोना हरला आणि माणुसकी जिंकली असेच म्हणावे लागेल.
Previous Articleकोरोनाबळींच्या संख्येत मेक्सिको जगात तिसऱ्या स्थानावर
Next Article शहर हेस्कॉम कार्यालयात पुन्हा कोरोनाचा शिरकाव








