इस्लामपूर / प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील पंचायत समिती, नगरपालिका प्रशासनाला शुक्रवारी कोरोनाने हादरवले. पालिका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती मधील एक विस्तार अधिकारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या तहसीलदार यांच्या पत्नी,मुलगी, मुलगा यांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. शुक्रवारी शहरासह वाळवा तालुक्यात 21 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. शहर व ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यातच गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासनातील कोरोना योध्यावर कोरोनाने हल्ला चढवला आहे. काही पोलीस अधिकारी, पंचायत समिती,महसूल प्रशासनातील अधिकारी पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसांपूर्वी येथील तहसीलदार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान शुक्रवारी त्यांच्या पत्नी, मुलगी, मुलगा यांनाही बाधा झाल्याने खळबळ उडाली.
शुक्रवारी नगरपालिकेत कोरोनाने शिरकाव केला. आरोग्य विभागाचे अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले. तर पंचायत समिती मधील एका विभागाचे विस्तार अधिकारी यांना कोरोनाने गाठले. त्यामुळे प्रशासनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रत्येक दिवशी रुग्ण संख्या वाढत चालली आहे. अशातच आरोग्य सुविधा कमी पडत आहे. साथीच्या रोगांनी डोके वर काढले आहे. त्यांच्यावर उपचार करणारी यंत्रणा नाही. शहरातील एक प्रसिद्ध डॉक्टर व त्यांच्या कुटुंबातील काही जण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभाग देखील धास्तावला आहे.
Previous Articleसार्वजनिक बँकांना बाहेरील भांडवलाची गरज : मूडीज
Next Article डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत








