दुसरी लाट भयावह : तीन महिन्यात नोंदीनुसार 426 बळी : हॉस्पिटल हाऊसफुल्ल : कुटुंब संसर्ग चिंताजनक
युवराज निकम/इस्लामपूर
कोरोना महामारीत वाळवा तालुक्याचे भोग वाढतच आहेत. रुग्ण संख्या वाढतेय. मृत्यू दर वाढतोय. इथं जणू मृत्यूच `दबा’धरुन बसला आहे. हॉस्पिटल ‘हाऊसफुल्ल’ आणि स्मशानभूमीत अखेरचा निरोप घेतानाही `वेटींग’ अशी स्थिती झाली आहे. वाळवा तालुक्याचे रुग्ण संख्येचे रोजचे आकडे सांगली शहर व मिरज तालुक्यालाही मागे टाकत आहेत. इथं प्रत्येक कुटुंब आणि माणूस भयभीत आहे. कडक निर्बंध, लॉकडाऊन असूनही कोरोनाचा होणारा शिरकाव चिंताजनक असून त्याचे कारण शोधून उपाययोजना करण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी सपशेल अपयशी ठरले आहेत.
पहिल्या लाटेत सांगली जिह्यात कोरोना रुग्णांचे खाते इस्लामपूर शहरात खोलले गेले. या पहिल्या लाटेपासून सुरु झालेले लोकांचे भोग दुसऱया लाटेत देखील कायम आहेत. किंबहूना पहिल्या लाटेपेक्षा ही दुसरी लाट अतिशय गंभीर वळणावर गेली असून `कुटुंब संसर्ग’ मोठÎा प्रमाणात वाढला आहे. अनेक कुटुंबातील सर्वच सदस्य एकावेळी बाधित झाले आहेत. परस्परांची काळजी घ्यायला, आधार द्यायलाही अडचणी येत आहेत. वाळवा व शिराळा तालुक्यातील शिरसी येथील काही दिवसांच्या अंतरात एकाच कुटुंबातील आई-वडील व मुलगा अशा तिघांचा मृत्यू झाला. ही घटना मृत्यू ह्दय पिळवटून टाकणारी आहे. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथेही तशाच प्रकारची घटना घडली. फार्णे कुटुंबातील तिघांना एकापाठोपाठ कोरोनाने हिरावून नेले. अशी कुटुंब संपताना पाहून उरात धडकी भरत आहे.
वाळवा तालुक्यात दररोज सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत आणि सर्वाधिक मृत्यू होत आहेत. मार्च ते मे या दोन महिन्यांत रुग्ण हॉस्पिटल आणि स्मशानभूमीच्या वाटेवर आहेत. हॉस्पिटलमध्ये बेड्स मिळवताना नातेवाईक हतबल होत आहेत. बेड्स मिळाला तरी रुग्ण वाचेल याचा भरवसा नाही. लाखो रुपये खर्च करुनही रुग्ण दगवल्याने नातेवाईक मानसिक आणि आर्थिकदृष्टÎा खचत आहेत. अनेक हॉस्पिटल या महामारीत ही आर्थिक लूट करीत आहेत. आतापर्यंत अनेकांना आर्थिक व्यवहाराचे ऑडिट होते हे ठावूक होते, पण कोरोनात हॉस्पिटल खर्चाचे आणि वाढत्या मृत्यूंचे ऑडिट करण्याची वेळ शासन व प्रशासनावर आली आहे. इस्लामपूर स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्याने मृतदेह अंत्यसंस्कारासाठी काही काळ थांबवून ठेवावे लागत आहेत.
शहरातील काही खाजगी व शासकीय कोव्हिड सेंटर (हॉस्पिटलमधील) कोरोना रुग्ण मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. ऑगस्ट 2020 पासून नगरपालिकेच्या रेकॉर्डनुसार उपलब्ध झालेली आकडेवारी चिंताजनक आहे. नातेवाईकांनी नेलेल्या मृत्यूच्या दाखल्यावरुन ही आकडेवारी पुढे आली आहे. महिना निहाय मृतांची संख्या अशी – ऑगस्ट 2020 – 44
सप्टेंबर 2020 – 161
ऑक्टोबर 2020 – 57
नोव्हेंबर 2020 – 07
डिसेंबर 2020 – 04
जानेवारी 2021 – 03
फेंब्रुवारी 2021 – 01
मार्च 2021 – 04
एप्रिल 2021 – 213
मे 2021 – 209(आजअखेर)
एकूण मृत्यू – 703
पहिल्या लाटेत ऑगस्ट 2020 ते फेब्रुवारी 2021 या सात महिन्याच्या काळात अवघ्या 277 मृतांची नोंद आहे. तर दुसरी लाट मार्चपासून सुरु झाली. एप्रिल व मे या दोन महिन्यात 422 जणांना प्राण गमवावा लागला आहे. या दोन महिन्यातच कोरोनाचा कहर वाढला आहे. आणि अजूनही वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्ण ऍडमिट होण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी पॉझिटिव्ह रुग्णांची यादी वाढतच आहे. हे वाढते प्रमाण चिंताजनक आहे.