अभिजीत शेळके / बागणी
कोरोना रोगाची सुरुवात होऊन आता जवळपास पाच महिने होत आले. संपूर्ण देशच लोक डाऊन झाला आणि या बंदला सुरवात झाली. गल्लीपासून ते दिल्ली पर्यंत सर्व काही या लॉकडाऊनमुळे बंद झाले. पण या बंद काळात व्यापारी व छोटे मोठे व्यावसायिक पुरते भरडून निघाले आहेत. कोरोनाने आता आपले पाय ग्रामीण भागात देखील रोवले आहेत. गल्ली गल्लीत पेशंट सापडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात देखील वारंवार बंद पाळले जात आहेत.
या सततच्या बंदला आता व्यापारी पुरते वैतागून गेले आहेत. लॉकडाऊन मुळे व्यवसाय, छोटे मोठे धंदे यांची वाट लागली आहे. अनेकांचे या बंद मुळे कंबरडे मोडले आहे. ज्यांनी कर्ज काढून व्यवसाय उभारणी केली आहे त्यांना दिवसा तारे दिसत आहेत. बंद ठेवून यावर मार्ग निघणार नाही. लोकांचे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे. आता कोरोना पेशंट सापडने हे काय नवीन राहिले नाही. ज्याभागात पेशंट सापडतील तो भाग पूर्णपणे सील करणे व त्या घरच्या लोकांना सक्तीने किमान १० दिवस तरी होम क्वारंटाईन करणे गरजेचे आहे.
गावात ग्रामपंचायत प्रशासनेने मास्क न वापरणाऱ्या लोकांवर व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या दुकानदार यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे आहे. पण आता बंद हा विषयच या पुढे बंद होणे गरजेचे आहे अशी भावना आता सर्व सामान्य लोकांच्या मधून व व्यावसायिक वर्गातून येत आहे. खरे तर दुकानदार, व्यापारी यांनी येणाऱ्या ग्राहकाला मास्क सक्ती, सॅनिटायझर वापर आणि सोशल डिस्टन्स ठेवला तर वारंवार बंद टाळता येणे शक्य आहे असे मत सरपंच संतोष घनवट व उपसरपंच विष्णु किरतसिंग ग्रामसेवक आर. डी. कोळी यांनी व्यक्त केले.








