प्रतिनिधी / विटा
काल झालेल्या वादळी पावसाने तालुक्यातील सांगोले, देवनगर, वाळूज, जोंधळखिंडी येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या असल्याचे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी सांगितले.
याबाबत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी दिलेली माहिती अशी, रविवारी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील काही भागात अचानक वादळी वारे आणि पाऊस सुरू झाला. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ज्या लोकांनी पीकविमा काढला आहे, त्यांच्या नुकसान भरपाईची जबाबदारी विमा कंपनीने घेतली पाहिजे. त्यासाठी संबधीत कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या सोबत बैठक करून त्यावर मार्ग काढण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.
शेतकऱ्यांनी खचून न जाता प्रशासनास सहकार्य करावे. आपल्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास मदत करावी. प्रशासनाने कोणीही नुकसानग्रस्त शेतकरी यापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन बाबर यांनी केले आहे.








