आटपाडी / प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यासह सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस लक्षणिय वाढ होत आहे. प्रशासन अनेक दावे करत असलेतरी या वाढत्या रूग्णसंख्येला नियोजनशुन्य कारभार कारणीभुत ठरला आहे. लोकांच्या सेवेसाठी झटणारे नेते पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनाच्या पुढे जावुन नेत्यांनी कोरोनाबाधितांच्या सेवेवर लक्ष दिले आहे. असे असताना आरोग्य विभाग वगळता प्रशासन फक्त कागदोपत्री कामकाज करत आहे. कोरोनाचा समुह संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आटपाडीत तात्काळ लॉकडाऊन करावा, अशी मागणी युवा नेते विनायक मासाळ यांनी केली आहे.
आटपाडी शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या साडेसहाशेच्या घरात आहे. माजी आमदार, शिवसेना नेते पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर हे देखील पॉझिटिव्ह आले आहेत. त्या पार्श्वभुमीवर प्रशासन कोठे आहे ? असा सवाल युवा नेते विनायक मासाळ यांनी केला आहे. प्रशासनापेक्षा खासदार संजयकाका पाटील, आमदार अनिलभाऊ बाबर, तानाजीराव पाटील व नेत्यांनी कोरोनासाठी अहोरात्र कष्ट घेतल्याची वस्तुस्थिती आहे. लोकांच्या काळजीपोटी सर्वतोपरी प्रयत्न करत ही मंडळी कष्ट घेत आहेत. आटपाडी तालुक्यात आरोग्य विभाग अहोरात्र कष्ट घेत आहे. त्यांनी केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे.
आरोग्य विभाग वगळता प्रशासन मात्र काहीही उपाययोजना करत नाही. कोरोनाबाधित सापडल्यानंतर करायचे सोपस्कर प्रशासनाकडून पार पाडले जात आहे. प्रशासनातील अधिकारी गर्दी नियंत्रणात आणणे, मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कारवाई करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी कारवाई करणे याकडे कानाडोळा करून आहेत. मागील तीन महिन्यांपासुन प्रशासकीय पातळीवरून कोरोनाच्या उपाययोजनांकडे पुर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोपही विनायक मासाळ यांनी केला.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे चित्र विदारक असून जिल्हाधिकाऱ्यांचे हे मोठे अपयश आहे. बेडची उपलब्धतेबाबत चुकीची माहिती सांगितली जात आहे. सर्वसामान्यांना बेड मिळत नसल्याने मृत्युदर वाढला आहे. असे असताना तालुकानिहाय ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची उपलब्धता करण्यात जिल्हाधिकारी कमी पडले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आटपाडीसह सांगली जिल्ह्यातील स्थानिक उपचार साधने वाढविण्याला प्राधान्य द्यावे. तसेच सांगली जिल्ह्यातील संसर्ग रोखण्यासाठी लॉक न करावा, अशी मागणीही विनायक मासाळ यांनी केली.
Previous Article‘मातोश्री’ वर दुबईहून निनावी फोन; बंगला उडवून देण्याची धमकी नाही
Next Article सांगली : विटा नगरपरिषद सुसज्ज कोविड सेंटर उभारणार








