वार्ताहर / कोकरूड
वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना मिळवून देणारा असे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. नाठवडे ता. शिराळा येथे स्थानिक आमदार विकास निधीतून ३ लाख रुपये खर्चाच्या विकास कामांच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना आ. खोत म्हणाले की, वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी, योजनेत जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मिळालेले नाही. बऱ्याच दिवसांपासून शेतकरी योजनेचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी प्रयत्न करणार असून लवकरच हा मुद्दा मार्गी लावण्यात येईल.
हत्तेगाव, खिरवडे, मेनी खोरा व उत्तर भागातील शेतकऱ्यांना योजनेचे पाणी मिळालेले नाही. तसेच वाकुर्डे बुद्रुक योजनेमध्ये गेलेल्या जमिनीची नुकसान भारपाही मिळवून देण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. याबाबत पुढील आठवड्यात शिराळा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेऊन बैठक घेणार असून हा मुद्दा लवकरच मार्गी लावणार आहे.
स्थानिक आमदार विकास निधी मधून मंजूर तीन लाख रुपयांत केलेल्या विविध कामांचे उद्घाटन आमदार सदाभाऊ खोत यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच बाजीराव मोहिते यांनी आ. सदाभाऊ खोत यांचा सत्कार केला. यावेळी रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्र पक्षप्रमुख सागर खोत, शिराळा तालुका अध्यक्ष सत्यजित कदम, प्रमोद पाटील, दिनकर शेडगे, सरपंच बाजीराव मोहिते, शकील मुजावर, तानाजी मोहिते, सुरेश पाटील, सर्जेराव कांबळे, बळवंत मोहिते, सुभाष मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.