वांगी / वार्ताहर
वांगी (ता.कडेगांव) येथील जिल्हापरीषदेच्या गाळ्यात असणारे “मनमोहन नाँव्हेल्टीज अँड गिफ्ट गँलरी” हे दुकान (शनिवार) रात्री दिडच्या सुमारास जळून खाक झाले. यामध्ये मोहन माने यांचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेची नोंद चिंचणी पोलिस ठाण्यात झाली आहे.
वांगीच्या मुख्य चौकात असलेल्या जिल्हापरीषदेच्या दुकानगाळा नं.४ मध्ये मोहन विष्णू माने यांनी “मनमोहन नाँव्हेल्टीज अँड गिफ्ट गँलरी” हे दुकान कर्ज काढून वर्षापूर्वी थाटले होते. स्टेशनरी-कटलरी साहित्य व बेकरीचे पदार्थ मिळत असल्याने दुकानात गिऱ्हाईकांची सतत वर्दळ असे. काल रात्री माने हे ९ वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी गेले होते. रात्री दिडच्या सुमारास रणजित मोहिते या युवकाने आग लागलेचा प्रकार माने याना फोनवरुन सांगीतला.ते कुटूंबीयांसह धावत आले.शटर प्रचंड गरम झाले होते तशातच कुलूप काढून पाहिले असता आत आगडोंब सुरु होता. आजुबाजूच्या घरातून पाणी आणून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र ते शक्य झाले नाही. सोनहिरा साखर कारखान्याचा अग्निशमन गाड्यांनी आग आटोक्यात आणली मात्र तोवर सर्व साहित्य खाक झाले होते. आज दुपारी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्याचे हवालदार विशाल साळुंखे यांनी पंचनामा केला आहे.अद्याप गावकामगार तलाठी व ग्रामविकास अधिका-यांकडून पंचनामा होणे बाकी आहे.








