अवैधरित्या बाळगलेले ३८ पक्षी व प्राणी घेतले ताब्यात
कुपवाड / प्रतिनिधी
सांगलीच्या वन विभागाने गुरुवारी सांगलीत विजयनगर भागात राहणाऱ्या एका प्राणी मित्राच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत अधिकाऱ्यांनी प्राणी मित्राच्या घरात अवैधरित्या बाळगलेले विविध जातीचे ३८ पक्षी व प्राणी ताब्यात घेऊन बेकायदा वन्यपक्षी व प्राणी बाळगल्याप्रकरणी ‘त्या’ प्राणीमित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये संशयित अशोक लकडे (रा. पार्श्वनाथ नगर, विजयनगर सांगली) असे त्या प्राणी मित्राचे नाव आहे. त्याला लवकरच अटक करून यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत सखोल चौकशी करणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक विजय माने यांनी दिली.
अशोक लकडे याने त्याच्या घरात गेल्या काही वर्षापासून अवैधरित्या विविध जातीचे प्राणी आणि पक्षी बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशोक लकडे याच्या ताब्यातील २६ घारी, १ घुबड, १ गाय बगळा, २ कांडे करकोच,१ गरुड, २ माकड, ४ कासव व एक मृत घार अशी ३८ पक्षी व प्राणी ताब्यात घेतले आहेत.








