प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या दुष्ट चक्रामुळे शंभर वर्षानंतर देशावर फार मोठे आर्थिक व आरोग्य विषयक संकट आले. त्यामुळे त्याचा परिणाम उत्पादन आणि नोकऱ्यावर झालेला दिसून येतो. विशेषतः देशातील तरुणाईवर फार वेगळा परिणाम झालेला दिसून येतो मात्र लॉकडाऊनमधून देशातील तरुणाईने वेगळा अनुभव घेतला असल्यामुळे लॉकडाऊननंतरची तरुणाई आर्थिक, सामाजिक व आरोग्य विषयक जाण आणि भान असणारी असेल असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक आणि कवी प्रा. संजय ठिगळे यांनी व्यक्त केले.
सांगलीतील डॉ. वसंतराव जुगळे सोशल सर्व्हिसेस अँड रिसर्च फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रा. ठिगळे यांचे ‘लॉकडाऊन नंतरची तरुणाई’ या विषयावर बीजभाषण झाले. प्रारंभी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रा. डॉ. योजना जुगळे यांनी फाऊंडेशन राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन उपस्थितांचे स्वागत केले.
मार्गदर्शनपर भाषणात प्रा. ठिगळे म्हणाले की, कोरोनामुळे संपूर्ण जगाला लॉकडाऊनच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्याचा सर्वच घटकावर परिणाम झालेला दिसून येतो मात्र तरुणाईवर झालेला परिणाम फार वेगळ्या पद्धतीचा आहे. शिक्षण व नोकरी बाबत तरुणाई मध्ये काळजी वाढलेली आहे. त्याबरोबरच तरुणाईमधील उत्साह काही अंशी कमी झाला असला तरी लॉक डाऊन उठणार आहे हे माहीत असल्यामुळे लॉक डाऊन नंतरची तरुणाई काही प्रमाणात आर्थिक शिस्त पाळणारी,आरोग्याची काळजी घेणारी आणि व नवीन काही तरी करणारी असेलअसे वाटते असा विश्वास व्यक्त केला. मात्र लॉक डाऊननंतरसुद्धा सरकारचा आरोग्य, शिक्षण, संरक्षण व संशोधनावरील खर्च वाढणार आहे. देशातील तरुण लॉकडाऊन उठला म्हणून बेजबाबदारपणे वागू लागलो तर देशाच्या सर्वागीण हिताच्या दृष्टीने घातक आहे. आर्थिक शिस्त,आरोग्य संवर्धन यावर भर द्यावाच लागेल अन्यथा अनर्थ अटळ आहे. सूत्रसंचालन फाउंडेशनच्या सचिव प्रा.रिना जुगळे यांनी केले. वेबिनारचे संयोजन प्रमोद जुगळे, अनुप ठोंबरे यांनी केले.