प्रतिनिधी/सांगली
मान्यताप्राप्त लेखापरिक्षकांच्या यादीत नाव कायम ठेण्यासाठी तक्रारदारांकडून तब्बल एक लाख पाच हजारांची लाच घेताना जिल्हा विशेष लेखा परिक्षकास (सहकारी संस्था) रंगेहात पकडण्यात आले. रवींद्र बाळकृष्ण वाघ (वय 52) असे त्यांचे नाव आहे. विजयनगर येथील प्रशासकिय इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान वाघ लाच घेताना सापडल्याने प्रशासकिय इमारतीमध्ये खळबळ माजली.
याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार हे एका चार्टंट अकाउंटंन्सीच्या फर्ममध्ये सहयोगी आहेत. तक्रारदार यांच्या फर्मने एका संस्थेचे लेखा परिक्षण केले होते. त्याचे शुल्क दहा लाख 50 हजार इतकी होते. या लेखा परिक्षण अहवाल जिल्हा विशेष लेखा परिक्षक यांना 31 जानेवारी 2021 किंवा त्यापूर्वी येणे अपेक्षित होते. परंतु मागील वर्षी कोरोना संकटामुळे तक्रारदार यांच्या फर्मकडून लेखा परिक्षणाचा अहवाल मुदतीत सादर झाला नाही. तक्रारदार यांच्या फर्मचे नाव मान्यताप्राप्त यादीतून काढू नये, यासाठी जिल्हा विशेष लेखापरिक्षक वाघ यांनी दहा लाख 50 हजारांच्या दहा टक्के म्हणजे एक लाख 5 हजारांच्या लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये 15 मार्च रोजी तक्रार दिली. त्याच दिवशी तक्रारीचा पडताळणी करण्यात आली. त्यावेळी वाघ यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे समोर आले. त्यानुसार आज प्रशासकीय इमारतीतील वाघ यांच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला होता. त्यामध्ये तक्रारदार यांच्याकडून एक लाख 5 हजारांची लाच घेताना रंगेहात वाघ यांना पडकण्यात आले. या प्रकरणी त्याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान जिह्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. वाघ लाच घेताना जाळ्यात सापडल्यानंतर प्रशासकिय इमारतीमध्ये एकच खळबळ माजली. वर्गएक दर्जाचा अधिकारी लाच घेताना सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उपाधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, सुहेल मुल्ला, भास्कर भोरे, अविनाश सागर, संजय कलकुटगी, सीमा माने, धनंजय खाडे, श्रीपती देशपांडे, बाळासाहेब पवार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
लाच मागितल्यास फोन करा
शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करावी. तक्रारीसाठी 1064 हा टोल फ्री क्रमांक आहे. तक्रार करणाऱया तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, अशी माहिती उपाधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.








