कोविड हॉस्पीटल व त्यांना संलग्न औषध दुकानांनाच पुरवठा करणे बंधनकारक
सुरळीत पुरवठा व वाटपावर नियंत्रणासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी / सांगली
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिवीरला औषधांच्या दुकानावरुन थेट विक्रीस बंदी घालण्यात येत असून रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा स्टॉकिस्ट यांच्याद्वारा केवळ कोविड हॉस्पिटल व कोविड हॉस्पीटलला संलग्न असलेली औषध दुकाने (फार्मसी) येथेच करण्यात यावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

रेमडेसिवीर औषधाचा पुरवठा हॉस्पिटलना सुरळीत व्हावा व रेमडेसिवीर पुरवठादार यांच्यावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहा. आयुक्त नितीन भांडरकर व औषध निरिक्षक विकास पाटील यांची नियुक्तीही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली आहे. नियुक्ती केलेले अधिकारी रेमडेसिवीर पुरवठा करणाऱ्या औषध कंपनी यांच्याकडून होणारा पुरवठा व वाटप यावर नियंत्रण ठेवण्याकरीता तपासणी करुन पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणार आहेत. तसेच रेमडेसिवीरची कमतरता भासणार नाही यांची दक्षता घेणार आहेत. अशीही माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.








