बिलासाठी मृतदेह अडविल्याच्या कारणातून झाली होती तोडफोड, तक्रारीत मानव अधिकार कार्यकर्त्याचा समावेश
प्रतिनिधी / मिरज
बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्याचा आरोप करीत सांगली-मिरज रस्त्यावरील खासगी कोविड सेंटरमध्ये झालेल्या तोडफोड प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने महात्मा गांधी चौकी पोलिसात तिघांविरुध्द तक्रार दिली आहे. यामध्ये एका मानव अधिकार कार्यकर्त्याचाही समावेश आहे. रुग्णालयाच्या अकौंटंट निशा अमित पाटील (वय ४०, रा. हनुमान मंदिरसमोर, सध्या रा. वारणाली, गल्ली नं. पाच, विश्रामबाग) यांनी फिर्याद दिली असून, रुग्णालयाचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
रुग्णालय प्रशासनाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, कृष्णा परशुराम घुले (रा. महावीर नगर, पंढरपूर), मानव अधिकार कार्यकर्ते राजू जाधव (वय ३५, रा. सांगली) आणि एक अनोळखी इसम अशा तिघांवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व व्यक्ती अधिनियम २०१० च्या कलम तीन व चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर येथील एकाच कुटुंबातील तीन रुग्ण सांगली-मिरज रस्त्यावरील एका खासगी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत होते. शुक्रवारी रात्री यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना बिल भरण्यास सांगितले असता, कृष्णा घुले व टायगर ग्रुपचे मानव अधिकार कार्यकर्ते राजू जाधव तसेच अन्य एक अनोळखी इसम अशा तिघांनी आमचे बिल एवढे कसे झाले, असे म्हणून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत हैदोस घातला होता. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालयाच्या दरवाजाची काच, बायोमेट्रीक थंब मशिन, पाण्याचा जार, व्हेंटीलेटर बायपॅप मशिन आदी साहित्याची मोडतोड करुन सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान केले आहे, अशी फिर्याद रुग्णालय प्रशासनाने महात्मा गांधी चौकी पोलिसात दिली आहे. रुग्णालयाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मानव अधिकार कार्यकर्ते राजू जाधव, कृष्णा घुले याच्यासह अन्य अनोळखी तरुण अशा तिघांवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व व्यक्ती अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.








