प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील रेठरे धरणचे सुपुत्र, माजी सरपंच, राजारामबापू सह. साखर कारखान्याचे संचालक व उद्योजक आनंदराव दत्तू पाटील (काका वय ५५) यांचे अपघाती निधन झाले. त्यांचे निवासस्थान व पेट्रोल पंप वाघवाडी रस्त्याला समोरासमोर आहे. ते सोमवारी दुपारी रस्ता ओलांडून आपल्या बंगल्याकडे निघाले होते. दरम्यान इस्लामपूरकडून वाघवाडी फाट्याकडे चाललेल्या अल्टो कारने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ येथील डॉ. प्रदीप शहा यांच्या हॉस्पिटलमध्ये हलवले. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेचे वृत्त समजताच त्यांच्या हितचिंतकांनी हॉस्पिटलबाहेर गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजयी, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने रेठरे धरण परिसरासह वाळवा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.








