प्रतिनिधी / सांगली
केंद्र सरकारने कृषी संबधी तीन विधेयके पारीत केली आहेत. त्याला काँग्रेससह देशातील अनेक छोटे, मोठे पक्ष, संघटना विरोध करत आहेत. रस्ता रोको, रेल रोको, निदर्शने, मोर्चे, सह्यांच्या मोहिमा द्वारे याला विरोध दर्शवला जात आहे. परंतु जे शेतकरी, ग्राहक, व्यापारी, उद्योजकसाठी हे कायदे आहेत ते यापासून बऱ्यापैकी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने मंगळवार, दिनांक 10 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता सांगली येथील टिळक स्मारक मंदिरमध्ये या तीन कृषी विधेयके व यंदा गाळपास जाणाऱ्या ऊसाबाबत चर्चा आयोजित केली आहे.
या कार्यक्रमासाठी सहकार आघाडीचे राज्यप्रमुख संजय कोले, शेतकरी संघाचे सातारा जिल्हा प्रमुख बाळासो चव्हाण, मनोहर सणस लक्ष्मण रांजणे, आबासाहेब ताकवणे, कोल्हापूरचे अशोक पोवार, निंगू बिरादार, नवनाथ पोळ, शीतल राजोबा, अल्लाउद्दीन जमादार, राम कणसे, अशोक पाटील, सुभाष मद्वानां, गुंडा माळी, बाशेखान मुजावर, इ. उपस्थित राहणार आहेत. तरी शेतकरी, व्यापारी व शेतमाल ग्राहकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.








