प्रतिनिधी / सांगली
सद्यस्थितीत जिल्ह्यात लक्षणे नसलेल्या कोरोना बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येत असून या रुग्णांमध्ये कोणतीही गुंतागुंतीची लक्षणे निर्माण होऊ नयेत यासाठी त्यांची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने देखभाल करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता अतिदक्षता विभागांमध्ये बेडस् ची संख्या आवश्यक प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात बेडची व्यवस्था सर्व सुविधांसह 200 पर्यंत वाढविण्यात यावी असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
सांगली जिल्ह्यातील नागरी परिसरात लॉकडाऊन केल्या नंतर देखील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ प्रशासना सोबत बैठक घेतली. सांगली येथील शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीस डॉ. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. ननंदकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गिरीगोसावी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन पालकमंत्री जयंत पाटील यांनी रुग्णांना कोणत्याही स्थितीत आवश्यक व गुणवत्तापूर्ण उपचार मिळालेच पाहिजेत असे सांगून यादृष्टीने मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे सध्या असणाऱ्या बेडच्या संख्येमध्ये वाढ करून आयसीयू मधील बेड 200 पर्यंत वाढविण्यात यावेत असे निर्देश वैद्यकीय महाविद्यालय याचे अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर यांना दिले . तसेच कोविड केअर सेंटर मधील रुग्णांमध्ये लक्षणे उद्भवल्यास त्यांना तात्काळ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये संदर्भित करण्यात यावे व आवश्यक उपचार द्यावेत असेही त्यांनी निर्देशित केले.
यावेळी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अधिग्रहित करण्यात आलेली खाजगी रुग्णालय, कोरोणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था यांचा आढावाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी घेतला.