अचानक आगीची घटना घडल्यास उपययोजनांसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
प्रतिनिधी / मिरज
रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटनांची घटना अलीकडे वाढत आहेत. रुग्णालयांमध्ये अचानक आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने मिरज शासकीय रुग्णालयात शनिवारी आग प्रतिबंधक प्रात्यक्षिकांचे सादरीकरण झाले. महापालिका अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले.
महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांना आग प्रतिबंध उपाययोजनांचे प्रात्यक्षिक करुन प्रशिक्षण दिले जात आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार अग्निशमन विभागातील कर्मचारी कोविड रुग्णालयांमध्ये जावून सदर प्रात्यक्षिक सादर करीत आहेत. तसेच रुग्णालयात काम करणारे कर्मचारी व रुग्णांना आगीपासून बचाव करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे.
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे गेल्या वर्षी कोरोना रुग्णालयात रुपांतर झाले आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांवर या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णालयात आगीच्या घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सांगली जिह्यातील शासकीय रुग्णालयातील फायर ऑडीट करण्यात येत आहे. मागील महिन्यात सर्व रुग्णालयात फायर ऑडीट पूर्ण झाले असून, आता आग प्रतिबंधक उपाययोजनांचे प्रात्यक्षिक सादर करुन आगीपासून बचावासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्यासह अग्निशमन विभागातील जवानांनी मिरज शासकीय रुग्णालयात शनिवारी प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले.