पाणी पातळी 45 फुटांवर, सकाळी पुन्हा दोन फूट वाढले
प्रतिनिधी / मिरज
मागील दोन-तीन दिवसांचा मुसळधार पाऊस आणि कोयना धारणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे कृष्णानदीच्या पाणी पातळीत सलग तिसऱ्या दिवशीही वाढ झाली. गुरुवारी दुपारनंतर पावसाची रिपरिप थांबल्याने रात्री उशिरापर्यंत पाणी पातळी 43 फुटांवर स्थिर होती. मात्र शुक्रवारी सकाळी पुन्हा वाढ होऊन ती 45.1 फुटांवर पोहचली. मिरज कृष्णाघाटावरील स्मशानभूमीसह नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरले.
संततधार पावसाने झोडपून काढल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस पडत असल्याने धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. मुसळधार पाऊस आणि कोयनेचा विसर्ग यामुळे बुधवारी आणि गुरुवारी तब्बल 18 फूट पाणी वाढले होते. गुरुवारी दुपारपासून पावसाने उसंती घेतल्याने पाणी पातळी घटण्याची अपेक्षा होती. मात्र शुक्रवारीही त्यामध्ये दोन फुटांनी भर पडली. 43 फुटांवर स्थिर असणारी पाणी पातळी शुक्रवारी दुपारी 12 पर्यंत 45.1 फुटांवर पोहचली.








