प्रतिनिधी / मिरज
शहरातील रेल्वे जंक्शन आणि एसटी स्थानक परिसरात नशेखोर तरुणांचा हैदोस सुरूच आहे. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास लियालत महंमदहुसेन शेख (वय 49, रा. सुभाषनगर) या रिक्षा चालकावर चाकु हल्ला करण्यात आला. दोघा नशेखोर तरुणांनी मारहाण करून रोख रक्कम काढून घेतली. याबाबत शेख यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून रेल्वे आणि एसटी स्थानक परिसरात नशेखोर तरुणांच्या टोळक्यानी हैदोस घातला आहे. दोघा प्रवाशांच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाला. सदर सीसीटीव्हीत कैद झाली होती. मारहाणीतील एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. त्यानंतत इंडियन ऑइल टँकर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. तर दोनच दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनजवळील कपड्याचे दुकान फोडून चार लाखांची कपडे चोरून नेण्यात आली होती.
सोमवारी रात्रीही दोघा नशेखोर तरुणांनी पुन्हा हैदोस घातला. लियाकत शेख हे लघुशंकेसाठी थांबले असता त्यांची लूटमार करण्याचा हेतून चाकूने हल्ला करण्यात आला. त्यांच्या हाताला चाकू लागल्याने ते जखमी झाले. नशेखोरांनी मारहाण करून सहाशे रुपयांची रोख रक्कम काढून घेऊन पळ काढला. याबाबत शेख यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली असून, दोघा नशेखोर तरुणांवर गुन्हा दाखल झाला आहे.








