प्रतिनिधी / मिरज
शहरातील सांगलीकर मळा, श्रीनगरी कानडे कॉलनी येथे राहणाऱ्या डॉ. नितीन विश्वास चिकुर्डेकर (वय ३५) यांचा बंगला फोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेले सुमारे चार लाख रुपयांचे दागिने लंपास केले. २ जुलै ते ११ जुलै दरम्यान ही चोरी झाली आहे. याबाबत चिकुर्डेकर यांनी मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. उच्चभू लोकवस्तीत डॉक्टराचा बंगला फोडून चोरी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
डॉ. नितीन चिकुर्डेकर यांचा सांगलीकर मळा, श्रीनगर कानडे कॉलनी येथे कविषा रो बंगलो नं. ए ५ बंगला आहे. दोन जुलैपासून ते बाहेर गेले होते. अज्ञात चोरट्यांनी या बंगल्यावर पाळत ठेवून ही चोरी केल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश करुन आतील कपाटात ठेवलेले सोन्याच्या बांगड्या, मनगाल मणी, साखळी, लटकन, मंगळसूत्र, कानवेल जोड, कर्णफुले असे सोन्या-चांदीचे सुमारे चार लाख रुपयांचे दागिने लंपास केले.
चिकुर्डेकर हे रविवारी ११ जुलै रोजी घरी आले असता घरात चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली. त्यांनी याबाबत मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, सांगलीकर मळा परिसरात अनेक उच्चभू लोकांचे रो बंगलो आहेत. डॉक्टराचा बंगला फोडून चोरी झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. या भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.