प्रतिनिधी / मिरज
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शुक्रवारी मिरज महापालिका क्षेत्र आणि परिसरात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी आधीच जनता कर्फ्युला विरोध दर्शविला होता. व्यापाऱ्यांच्यात दोन गट पडल्याने दुकाने सुरू ठेवायची की नाही, याबाबत संभ्रम होता. अपवाद वगळता सर्वच व्यवसाय सुरू होते. जनता कर्फ्यु पहिल्या दिवशीच फेल ठरला.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी शुक्रवार 11 सप्टेंबर पासून दहा दिवसांच्या जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. 21 सप्टेंबरअखेर हा जनता कर्फ्यू असणार आहे. जनता कर्फ्यूची सक्ती नसल्याने पहिल्या दिवशी जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दुकाने बंद करण्यावरून व्यापाऱ्यांच्यामध्ये अगोदरच दोन गट पडले होते.
सकाळपासून व्यापाऱ्यांचा एक गट दुकाने बंद ठेवण्यासाठी आग्रह करीत होता, तर दुसरा गट दुकाने सुरू ठेवण्याची भूमिका घेत होता. त्यामुळे व्यापाऱ्यांच्यात संभ्रम निर्माण झाल्याने बहुतांशी व्यापाऱ्यांनी दुकाने सुरूच ठेवली. तर काहींनी दुकाने अर्धे शटर उघडून आपला व्यवसाय सुरूच ठेवला होता. लक्ष्मी मार्केट, तांदूळ मार्केट, गणेश मार्केट, सराफ रोड, हायस्कुल रोड, दत्त चौक, गाडवे चौक येथे गजबज होती. भाजी बाजार मात्र कोठेच भरला नाही.
लोणीबाजार आणि गाडवे चौकात बसणार भाजी बाजार आज भरला नाही. काही भाजी विक्रेत्यांनी त्यांची दुकाने सुरूच ठेवली होती. रिक्षा स्टोपवरही रिक्षा थांबून होत्या. दरम्यान दुकाने सुरू बंद असा प्रकार असला तरी शहरवासीयांनी देखील जनता कर्फ्युला अत्यल्प प्रतिसाद दिला. बाजार पेठांमध्ये खरेदीसाठी सकाळपासून गर्दी दिसून आली. रस्त्यावर दुचाकी वाहनांची संख्याही लक्षणीय होती. चौकाचौकात पोलीस बंदोबस्त होता. मात्र जनता कर्फ्यू सक्तीची नसल्याने कोणावरही कारवाई झाली नाही.
नागरिकांनी मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स पाळावा, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलिस करीत होते. मात्र जनता कर्फ्युच्या पहिल्या दिवशीच व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी अत्यल्प प्रतिसाद दिल्याने जनता कर्फ्यु फेल गेल्याचे दिसून आले.