एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात
प्रतिनिधी / मिरज
शहर आणि परिसरात मोटारसायकली चोऱ्या करणाऱ्या एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून चार मोटासायकली जप्त केल्या आहेत. महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली मूळ मालकांना परत करण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक कार्यरत आहे. सदर पथक गांधी चौकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना शासकीय तंत्रनिकेतन महाविदयालय समोरील रस्त्यावरून एक बालक वीना नंबरप्लेटची फॅशन प्लस मोटारसायकल घेऊन येत असताना दिसला. त्यास थांबणेचा इशारा केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्यास पकडून विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने सदरची मोटारसायकल तीन दिवसापूर्वी सिव्हिल हॉस्पिटल येथून चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने आत्तापर्यंत तीन मोटारसायकली चोरल्याचे सांगितले. त्याच्याकडून फॅशन प्लस, लाल काळ्या रंगाची होंडा कंपनीची स्टनर मोटारसायकल, राखाडी रंगाची होंडा कंपनीची डिओ मोपेड मोटासायकल आणि मोरपंखी रंगाची हिरो कंपनीची माईस्ट्रो इज मोपेड मोटासायकल अशा एकुण एक लाख, ६० हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या.








