३० हजारांच्या दारु साठ्यासह ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई, दोघांना सख्ख्या भावांना अटक
प्रतिनिधी / मिरज
‘ब्रेक दि चेन’ धोरणांतर्गत शहर आणि परिसरात विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु असताना शुक्रवारी रात्री तीनचाकी रिक्षातून बेकायदेशीर दारु विक्री करणाऱ्या दोघा भावांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ३० हजार रुपयांच्या दारु साठ्यासह रिक्षा, मोबाईल आणि रोख रक्कम असा ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दाऊदअली जंगलीसाब गदककर (वय 44), महंमदअली जंगलीसाब गदककर (वय 45, दोघे रा. गुरूवार पेठ, लोंढे कॉलनी, मिरज) या दोघा सख्ख्या भावांचा समावेश आहे.
सदर दोघे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पॅगो रिक्षा (एमएच-१०-के-४७८३) मधून एका पोत्यात दारुच्या बाटल्या घेऊन विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना सापळा रचून या दोघांना पकडले असता, त्यांच्याजवळ थ्रिएक्स देशी दारु ९० मिलीच्या १०० बाटल्या, टँगो पंच १८० मिलीच्या ९६ बाटल्या, थ्रिएक्स १८० मिलीच्या ४७ बाटल्या असा दारु साठा मिळून आला. पोलिसांनी दोघा भावांकडून सदर दारु साठ्यासह दोन मोबाईल, रोख रक्कम आणि पॅगो रिक्षा असा ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लॉकडाऊन कालावधीत बेकायदेशीर दारु विकल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.








