वाहन धारक आणि नागरिकांचा मुक्त संचार, पोलिसांकडून कारवाई, नाकाबंदी
प्रतिनिधी / मिरज
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेन’ धोरणांतर्गत लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला मिरज शहर आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, उद्योग, व्यवसाय आणि स्थानिक आस्थापने कडकडीत बंद पाळण्यात आली आहेत. शहर आणि परिसरातील सर्वच चौक आणि रस्त्यांवर शुकशुकाट आहे. पोलिसांनी काही प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी केली आहे. दरम्यान, अत्यावश्यक कामाशिवाय विनाकारण रस्त्यावर फिरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले असतानाही वाहनधारक आणि काही नागरिक मोकाट फिरत आहेत. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

शनिवारी विकेंड लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशीच सकाळपासून सर्वत्र शुकशुकाट होता. रेल्वे जंक्शन परिसर, एसटी स्टँड परिसर, मिशन चौक, भाऊराव पाटील चौक या शहराच्या प्रमुख ठिकाणी पोलिस बंदोबस्त होता. याशिवाय सराफ कट्टा रोड, लक्ष्मी मार्केट, दत्त चौक, गाडवे चौक, शास्त्री चौक, हायस्कुल रोड या परिसरात पोलीस बंदोबस्त नसला तरीही कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.
वाहनधारकांचा मुक्त संचार
दरम्यान, विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी कोणीही अत्यावश्यक कामाशिवाय घरातून बाहेर येऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले असतानाही काही नागरिक आणि शेकडोंच्या संख्येने वाहन धारक मोकाट फिरत असल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त व नाकबंदी नसल्याने वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ पहायला मिळाली. लहान मुले रस्त्यावर क्रिकेट खेळत होती. बंद बाजार पेठांमध्ये नागरिक घोळका करून बसल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.









