प्रतिनिधी / मिरज
शहरातील रेवणी गल्ली येथे कंटेन्मेंट झोनमध्ये मंगळवारी सायंकाळी अचानक दोन विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाले. अचानक खांबावरील दोन उच्च दाबाच्या तारा तुटल्याने हा प्रकार झाला. यामुळे कंटेन्मेंट झोन मधील अनेक घरातील मिटर जळून खाक झाले. आधीच कोरोनाच्या दहशतीखाली असलेल्या नागरिकांना अंधारात बसावे लागले.
या कंटेन्मेंट झोनमध्ये वीज महावितरणचे एकूण चार खांब आहेत. यामध्ये दोन खांबांवर उच्च दाबाच्या विद्युत तारा आहेत. या खांबांवरूनच केबलच्याही वायरांचे जाळे आहे. मंगळवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान दोन विद्युत खांबांवर एकाचवेळी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. यावेळी अनेक नागरिकांच्या घरातील मिटरही जळून खाक झाले. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर जळलेल्या वायरी बदलण्याचे काम सुरू केले आहे.
या परिसरात रेवणी गल्ली येथे गेल्या आठ दिवसापासून कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे एकाच गल्लीत दोन ठिकाणी कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. आज दुपारीही एक 13 वर्षाचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह सापडला. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.








