पोलिस महानिरीक्षकांची प्रस्तावास मंजूरी
प्रतिनिधी / मिरज
मिरज शहर आणि परिसरात डझनभर गंभीर गुह्यांची मालिका रचणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या सहा जणांच्या टोळीवर संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) तंर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी शहरातील सहा अट्टल गुन्हेगारांचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांना पाठविला होता. त्यास महानिरीक्षकांनी मंजूरी दिली आहे.
जिल्हा पोलिस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी मोक्कांतर्गत कारवाईसाठी पाठविलेल्या प्रस्तावात शौकत मेहबुब शेख (वय 21, रा. अमर टॉकीजसमोर, ख्वॉजा झोपडपट्टी), मोजेस रामचंद्र भंडारी (वय 22, रा. वॉन्लेस चेस्ट हॉस्पिटलजवळ, वॉन्लेसवाडी, भारती हॉस्पिटलमागे, विश्रामबाग, सांगली), भाग्यराज लुकस दारला (वय 21, रा. माणिकनगर, पाटील हॉस्पिटलमागे, मिरज), प्रथमेश राजेश संकपाळ (वय 23, रा. लक्ष्मी मंदिर, अभयनगर, पाण्याच्या टाकीजवळ, संजयनगर), आझाद सिकंदर पठाण (वय 21, रा. रेल्वे कोल्हापूर चाळ, वाघमारे फ्लॉट, मिरज) आणि विकी विकास कलगुटगी (वय 24, रा. कुंकूवाले गल्ली, मंगळवार पेठ, मिरज) या गुन्हेगारांचा समावेश आहे. या टोळीवर मिरज शहर पोलीस ठाणे आणि महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खुनाचा प्रयत्न, खंडणी, धारदार हत्यारे घेऊन दहशत माजविणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आता लवकर या टोळीला मोक्का लावला जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.








