गुजरातमधील व्यापाऱ्यांनी केली फसवणूक, गुन्हा दाखल
प्रतिनिधी / मिरज
मालगांव (ता. मिरज) येथील फैय्याज दादूलाल मुतवल्ली (वय 42) या द्राक्षबागायतदाराला गुजरातच्या व्यापाऱयांनी चार लाखाला गंडा घातला आहे. सुमारे आठ लाख रुपयांची द्राक्षे खरेदी करुन 3 लाख, 70 हजार रुपये दिले आहेत. उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने सुरत असिफ तांबोळी (बागवान), सलमान असिफ तांबोळी आणि बबलू असिफ तांबोळी (सर्व. रा. माण दरवाजा, बागवान गल्ली, सुरत) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
2019 च्या मार्च महिन्यात मुतवल्ली यांची संपूर्ण द्राक्षबाग व्यापारी असिफ तांबोळी (बागवान) व त्यांच्या मुलांनी खरेदी घेण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी मुतवल्ली यांना 8 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. मार्च महिन्यात त्यांनी संपूर्ण बागेतील द्राक्षे खरेदी केली. मात्र, ऍडव्हान्स म्हणून 3 लाख, 70 हजार रुपये मुतवल्ली यांना दिले.
उर्वरीत 4 लाख, 30 हजार रुपयांसाठी वर्षभर मुतवल्ली व्यापाऱयांकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. मात्र, त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. अलीकडे त्यांचा मोबाईलही बंद झाला आहे. त्यामुळे मुतवल्ली यांनी ग्रामीण पोलिसात त्या व्यापाऱयांविरोधात फिर्याद दिली आहे. गेल्या काही दिवसात द्राक्षबागायतदारांची व्यापाऱयांकडून फसवणूक होण्याचे प्रमाण वाढत आहे. द्राक्ष अथवा बेदाणे घेऊन त्याची पूर्ण रक्कम न देता पोबारा करतात.








