थर्टी फस्ट दिवशी ग्रामीण पोलिसांची कारवाई, दोघांना अटक
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील मालगांव आणि बेळंकी येथे मिरज ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून सुमारे 55 हजार रुपयांचा देशी -विदेशी दारुसाठा जप्त केला. या प्रकरणी अजित मुरग्याप्पा कट्टीकर (वय 21, रा. लक्ष्मीनगर, मालगांव) आणि संभाजी केशव कदम (वय 44, रा. डोंगरवाडी) या दोघांना अटक करण्यात आली आहे. थर्टी फस्ट दिवशी बेकायदेशीर दारु विक्रीसाठी हा साठा केल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याचे परिविक्षाधिन पोलिस अधिक्षक आदित्य मिरखेलकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सध्या मिरज तालुक्याच्या 22 ग्रामपंचायतीत निवडणुकीचे धुमशान सुरू असल्याने आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे थर्टी फस्ट दिवशी होणाऱ्या पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. मालगांव गावच्या हद्दीत लक्ष्मीनगर येथे अजित मुरग्याप्पा कट्टीकर आणि बेळंकी येथे संभाजी केशव कदम हे दोघे बेकायदेशीर दारु विक्री करीत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मालगांव येथे छापा टाकला असता अजित कट्टीकर याच्याजवळ मॅकडॉल्स कंपनीच्या विदेशी दारुचे सात बॉक्स मिळून आले. त्यामध्ये सुमारे 50 हजार, चारशे रुपये किंमतीच्या 180 मिलीच्या 336 बाटल्या असा दारुसाठा होता. तर बेळंकी येथे संभाजी कदम याच्याजवळ सुमारे अडीच हजार रुपये किंमीच्या देशी दारुच्या 180 मिलीच्या 30 बाटल्या मिळून आल्या. पोलिसांनी सदर दारुसाठा जप्त करून दोघांना अटक केली आहे. या करवाईवरून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशी दारू विक्री सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.








