पोलीसांनी धाडसाने पाठलाग करून पाच जणांना अटक केली
सर्व लुटारू रेकॉर्डवरील गुन्हेगार
प्रतिनिधी / सांगली
मार्केट यार्डातील आनंद नरेंद्र कुलकर्णी या प्लॅस्टिक व्यापाऱ्याला दुकानात चाकू चा धाक दाखवून दहा लाख 79 हजार 725 रूपये पळवून नेणाऱ्या पाच जणांच्या टोळीस विश्रामबाग पोलीसांनी पाठलाग करून पकडले. ही घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
आनंद कुलकर्णी यांचा मार्केट यार्डातील तिसऱ्या गल्लीत प्लॅस्टिक पिशव्याचा मोठा व्यापार आहे. ते नेहमीप्रमाणे पावणेनऊच्या सुमारास दुकान बंद करून रोख रक्कम मोजत असताना हे पाच लुटारू त्याठिकाणी आले. त्यांनी आम्हाला साखरेसाठी प्लॅस्टिक पाहिजे अशी मागणी केली. त्यावेळी कुलकर्णी हे त्यांना प्लॅस्टिक देण्यासाठी दुकानात वळले असता हे पाचही लुटारू दुकानाच्या आतमध्ये शिरले आणि त्यांनी कुलकर्णी यांना काही समजण्याच्या आधीच त्यांच्या गळ्याला चाकू लावून त्यांना मारून टाकण्याची धमकी देत दहा लाखाची रक्कम लुटली. त्यानंतर या चोरट्यांनी त्याठिकाणाहून पळ काढला. दरम्यान कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीसांना तात्काळ फोन केला.
विश्रामबाग पोलीसांनी घटनास्थळी येवून श्वान पथकाच्या सहाय्याने या चोरट्यांचा मार्ग काढला असता हे चोरटे यार्डातीलच एका दुकानाच्या पोटमळ्यावर लपून बसले होते. त्याठिकाणाहून या पाचही लुटारूंना पोलीसांनी ताब्यात घेतले व ही लुटली सर्व रक्कम जप्त केली. हे पाचही लुटारू रेकॉर्डवरील गुन्हेगार असून ते टिंबर एरियातील आहेत. विश्रामबाग पोलीसांनी तात्काळ कारवाई केल्याने व्यापाऱ्यांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.








