उद्योजिकेविरोधात गुन्हा दाखल : तब्बल साडे आठ वर्षापासून सुरू होता प्रकार : गुप्ताजी टेक्सस्टाईलवर कारवाई
प्रतिनिधी / सांगली
माधवनगर येथील गुप्ताजी टेक्सटाईल्समध्ये वीज मिटर आणि सी. टी. जोडणीमध्ये फेरफार करून साडेआठ वर्षात 4 कोटी 40 लाख 75 हजार 480 रूपयांची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता महेशकुमार राऊत यांनी गुप्ताजी टेक्सस्टाईल्सच्या उद्योजिका संगीता नीरजकांत गुप्ता (रा.सांगली) यांच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात वीज चोरीची तक्रार दिली आहे.
संगीता नीरजकांत गुप्ता यांचा माधवनगर येथे मे. गुप्ताजी टेक्सस्टाईल्स हा पॉवरलूम कारखाना आहे. पॉवरलूम वीज कनेक्शन मीटर व सी. टी. जोडणीमध्ये त्यांनी फेरफार करून वीज चोरीचा प्रकार गेल्या काही वर्षापासून सुरू ठेवला होता. महावितरणला विजेची गळती किंवा चोरी होत असल्याचे लक्षात आले होते. पण नेमकी चोरी कोठे होते ते सापडत नव्हते.
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी भरारी पथकाने अनेक छापे टाकले. 13 जुलै रोजी गुप्ताजी टेक्सस्टाईलवर छापा टाकला. पाहणीमध्ये सर्व काही व्यवस्थित आढळले. पण वीज मीटरची तपासणी केली असता त्यात फेरफार केल्याचे आढळले आणि ही वीज चोरी पथकाला सापडली. अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन तत्काळ सखोल चौकशी सुरू केली आहे. तेथील संपूर्ण पूर्ण डाटा काढला असता गेली 8 वर्षे आणि दहा महिन्यापासून ही वीज चोरी सुरू असल्याचे समोर आले.
या संपूर्ण कालावधीत टेक्सस्टाईलाने वीजवितरण कंपनीची तब्बल 4 कोटी 40 लाख 75 हजार 480 रूपयांची वीज चोरी केल्याचे स्पष्ट केले. भरारी पथकाने पंचनामा करून फेरफार केलेले वीज मीटर व अन्य साहित्य जप्त केले. राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात संगीता गुप्ता यांच्याविरूद्ध विद्युत कायदा 2003 नुसार गुन्हा दाखल केला आहे. शहर पोलीस तपास करत आहेत.
मनपाच्या बिल घोटाळ्यानंतर दुसरा प्रकार उघडकीस
महापालिकेच्या स्ट्रीट लाईटच्या बिलाचा कोट्यावधी रूपयांचा घोटाळा काही महिन्यापूर्वी समोर आला होता. त्यानंतर हा मोठा वीज चोरीचा प्रकार आता समोर आला आहे. सामान्य वीज ग्राहकांकडून थोडी जरी चूक झाली तर त्याच्यावर तत्काळ वीजवितरण कंपनी कारवाई करते. पण इतका मोठा वीज चोरीचा घोटाळा झाला असतानाही याकडे वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले का याचा तपास होण्याची गरज आहे.








