प्रतिनिधी/विटा
खानापूर तालुक्यातील माधळमुठी येथे गलाई व्यवसायातील वादातून महादेव रघुनाथ माळी(२९) या युवकाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 18) रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयित विश्वास उर्फ राहुल किसन माळी(24) याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, महादेव रघुनाथ माळी आणि राहुल किसन माळी यांचे उत्तर प्रदेश येथील सुजानगंज येथे गलाई दुकान होते. लॉक डाऊनमुळे हे सर्वजण सध्या गावी माधळमुठी येथे आले होते. मयत महादेव आणि संशयित राहुल माळी यांच्यात दुकानातील काही कारणावरून वाद सुरू होता.
शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास संशयित राहुल आणि महादेव यांच्यात महादेव यांच्या घरातच वाद झाला. दोघेही बाहेर घराच्या अंगणात आल्यानंतर संशयित राहुलने महादेव यांच्यावर हल्ला चढवला. महादेव यांच्या पोटावर धारदार शस्त्राने झालेला वार वर्मी लागला. यानंतर राहुलने घटनास्थळावरून पलायन केले. याच दरम्यान सोडवण्यासाठी आलेल्या महादेव यांच्या पत्नीने नातेवाईकाना बोलवले. जखमी महादेव माळी यांना तातडीने विटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. गलाई व्यवसायातील वादातून झालेल्या खुनामुळे माधळमुठीसह परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अंकुश इंगळे, पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मोहन चव्हाण, अमोल लोहार, विक्रमसिंह गायकवाड आणि अमर सुर्यवंशी यांनी संशयित आरोपी राहुल माळी यास अटक केली.
याप्रकरणी राजाक्का महादेव माळी यांनी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपी राहुल माळी याला अटक करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे करीत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








